शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांना ईडीचे समन्स

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावलं. सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आलं. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. त्यामुळं त्यांच्यावर ईडीची ही गदा आल्याचं पाहायला मिळालं.

आनंद अडसूळ यांची दोन ते अडीच तास ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणीही केली होती. नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या घरी ईडी पोहोचली. दरम्यान, सोमवारी सकाळी अडसुळांच्या मुंबईतील घरी ईडीचं पथक दाखल झालं असून, यामध्ये महिला आणि पुरुष अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले.

सोमवारीच अडसूळ यांना ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. सिटी कोऑपरेटीव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरु आहे. असं असतानाच अडसूळ पिता- पुत्रांना अटक होणार का, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईडीच्या हाती त्यांच्याविरोधातील सबळ पुरावे लागल्यास अडसूळ यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.

राणा दाम्पत्यापैकी नवनीत राणा यांच्या खोट्या जात प्रमाणपत्राचं वास्तव समोर आल्यामुळेच ईडीचं संकट मागे लागल्याचा आरोप अडसूळ यांच्याकडून करण्यात आला होता. पण, ईडीनं राजकीय दबावाचे हे आरोप फेटाळले असून, कागदपत्रांच्याच आधारे कारवाई सुरु असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, कागदपत्र आणि घोटाळ्याची व्याप्ती पाहता हा घोटाळा 900 कोटींच्या घरात पोहोचत आहे त्यामुळं त्याबाबतच्या प्रत्येक घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ईडीच्या रडारवर असणाऱ्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी या नेत्यांमध्ये आता अडसुळांचं नावही जोडलं गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.