आज दि.२८ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले
राज्यात अतिवृष्टीचा धोका

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पंजाबमध्ये पुन्हा राजकीय भूकंप
नवज्योत सिंग सिद्धू यांचा राजीनामा

पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी थांबत नसल्याचं दिसत आहे. आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवलेले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग
भाजपमध्ये प्रवेश करणार!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली. पण ही समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्यात 2 नोव्हेंबरपासून
सीईटी परीक्षा : सामंत

उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदे घेत महाविद्यालयं सुरु करण्याबाबत आणि सीईटी परीक्षेबाबत (CET Exam) माहिती दिली. महाविद्यालयं 2 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा मानस असून ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल अशी माहिती सामंत यांनी दिली. सीईटी परीक्षा झाल्यानंतर महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. सीईटीला एकूण 8 लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार आहेत.

पालघर जिल्हा परिषद
निवडणुकीसाठी भाजप मनसे एकत्र

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु असताना दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी दिली आहे.

गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी
मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतर अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत चौकशीत माझी सहकार्याची भूमिका असेल.

शिवसेनेच्या खासदार भावना
गवळी यांच्यावर ईडीची कारवाई

वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) फास आणखीन घट्ट झालाय. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही अटक केलीय. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश मध्ये एक लाख
स्मार्टफोन वाटप करणार

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशा राजकीय नेत्यांकडून घोषणांना जोर आलाय. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये १ लाख २३ हजार स्मार्टफोन वाटप करणार असल्याची घोषणा लखनौमध्ये केलीय. हे स्मार्टफोन राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिले जाणार आहेत. याशिवाय अंगणवाड्यांना इन्फेंटोमीटरही दिले जाणार आहे. या घोषणेचा २०२२ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार हे आता पाहावं लागणार आहे.

गीतकार जावेद अख्तर यांना
न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी आता न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने दाखल केलेल्या या तक्रारीमुळे जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

चीनच्या सीमेवर 50 हजाराहून
अधिक सैनिक तैनात

चीनच्या नव्या भूमिकेमुळे सीमेवर तणाव वाढत आहे. चीनने सीमेवरील युद्धाला शह निमंत्रण देण्यासारखी कृती सुरु केली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या भागात 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केल्यानंतर चिनी सेना मोठ्या प्रमाणावर ड्रोन (Drone) वापरत आहे. हे ड्रोन भारतीय चौक्यांजवळ उडविण्यात येत आहेत. अधिकृत सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) ड्रोन (Drone) हालचाली बहुतेक दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स भागात दिसत आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.