मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्धच्या कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या पाच प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्र पोलिसांकडून आपल्याकडे घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेने मंगळवारी उशिरा या प्रकरणात गुन्ह्यांची नोंद केली. मुंबई व ठाण्यात नोंदवण्यात आलेले पाचही गुन्हे सीबीआयने स्वत:ची प्रकरणे म्हणून व आपल्या प्रक्रियेनुसार पुन्हा दाखल केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी एका पोलीस निरीक्षकाला तो तपास करत असलेल्या गुन्ह्यातून काही आरोपींची नावे वगळण्यास सांगितले आणि या ‘बेकायदा तोंडी सूचना’ न पाळल्याबद्दल त्याचा छळ केला, यांसह विविध आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईतील एका पोलीस निरीक्षकाच्या संगनमताने एका बारच्या भागीदाराकडून ९ लाख रुपये व २.९२ लाखांचे मोबाइल फोन उकळल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्चला एका आदेशान्वये या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.