‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटातून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
झी मराठी वरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही अमोल कोल्हे यांची मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर आता ते ‘विठ्ठल विठ्ठला’ या चित्रपटात एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांनी दिग्दर्शक जयंत गिलाटर यांच्यासोबत याआधी ‘रणभूमी’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. तर जयंत गिलाटर यांनी बॉलिवूड चित्रपट ‘चॉक अँड डस्टर’, ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा गुजराती रिमेक, ‘गुजरात ११’ तसेच सुपरहिट चित्रपट हल्की फुलकी इत्यादी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
जयंत गिलाटर यांच्या मते ‘विठ्ठल विठ्ठला’ हा आजच्या पिढीतील तरूणाई चा विषय आहे. आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीला बळी पडून आपली भारतीय संस्कृती आणि मूल्ये विसरत चालली आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा सामाजिक संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. ‘विठ्ठल विठ्ठला’ ची निर्मिती संगिता अहिर, बालागिरी वेठगिरी आणि जयंत गिलाटर करणार आहेत, चित्रपटाला डब्बू मलिक संगीत देणार आहे.