आज दि.२५ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

भोंग्यासंदर्भातील
भूमिकेवर मनसे ठाम

मशिदींवरील भोग्यांवरुन राजकारण तापलेलं असताना राज्य सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. मात्र या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गैरहजर होते. बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. तसंच मनसेने बैठकीत आपण अल्टिमेटम दिल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं नसल्याची माहिती दिली. बैठकीत सहभागी झालेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.

भोंग्यासंदर्भात केंद्र सरकारनं राष्ट्रीय
पातळीवर धोरण जाहीर करावं

भोंग्यासंदर्भात केंद्र सरकारनं राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावं अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली. “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याचा भंग झाला तर आवश्यक ती कारवाई पोलिसांनी करणं आवश्यक आहे,” असं दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

राणा दाम्पत्याची याचिका
मुंबई हायकोर्टाने फेटाळली

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दांपत्याला मुंबई हायकोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे. प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला रविवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने सुनावणीदरम्यान राणा दांपत्याला फटकारलं. दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास ७२ तासांची नोटीस द्यावी असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे.

सत्ता गेल्यानंतर लोक
अस्वस्थ झालेत : शरद पवार

महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे लोक मुख्यमंत्र्यांचा एकरी उल्लेख करतात. तसेत ते शिवीगाळ करतात, हे योग्य नाही. निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणारच्या घोषणा त्यांनी दिल्या होत्या. आता सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. सत्ता येते आणि जाते त्यामुळे इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्रीपद ही एक संस्था आहे. अपशब्द वापरणे योग्य नाही. धार्मिक श्रद्धा प्रत्येकाने स्वतःपुरती ठेवावी. भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पवार म्हणाले

२०२१ मध्ये भारतात तब्बल
४८ अब्ज रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून भारतासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं घातलं. अनेक महिने निर्बंध सहन केल्यानंतर जगाने आता मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यानच्या काळात जगभरातील व्यापार आणि उद्योग बंद पडले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले. २०२१ मध्ये भारतात तब्बल ४८ अब्ज रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स झाले आहेत. हा आकडा आपल्या शेजारील चीनसारख्या बलाढ्य देशाच्या तुलनेत जवळपास तीनपट अधिक आहे. २०२१ मध्ये चीनमध्ये १८ अब्ज रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स झाले आहेत. एसीआय वर्ल्डवाइडने दिलेल्या अहवालानुसार, भारताचा हा आकडा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या सर्व देशात झालेल्या रिअल टाइम ट्रान्झेक्शन्सच्या तुलनेत साडेसहापट अधिक आहे.

इमान्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा एकदा
फ्रान्स देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. जवळपास २० वर्षांनंतर पहिल्यांदाच फ्रान्समध्ये विद्यमान अध्यक्षाला जनतेने पुन्हा निवडून दिले आहे. मॅक्रॉन यांच्या प्रतिस्पर्धी नॅशनल रॅली आघाडीच्या मारी ला पेन यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पराभव झाला असून त्यांच्यासाठी हा तिसरा पराभव ठरलाय. ‘रिपब्लिक ऑन द मूव्ह’ आघाडीचे मॅक्रॉन यांना ५८ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली, तर मारी ला पेन यांना जवळपास ४२ टक्के मते मिळाली. मॅक्रॉन यांच्या विजयानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मॅक्रॉन यांच्या विजयानंतर एक विशेष ट्विट केलंय.

रुळावरून घसरलेल्या रेल्वेचा
डबा थेट प्लॅटफॉर्मवर चढला

चेन्नईच्या बीच स्थानकावर सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. लोकल ट्रेनचा (EMU) डबा रुळावरून घसरून प्लॅटफॉर्मवर चढला आणि एकच धावपळ उडाली. ट्रेनचा डबा प्लॅटफॉर्मवर येताच उपस्थित लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. रिकाम्या इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (EMU) यार्डमधून स्थानकात नेत असताना ही घटना घडली, अशी माहिती दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस. गुगनेसन यांनी दिली. “शेड लाईनवरून प्लॅटफॉर्म १ वर रिकामा EMU रेक घेऊन जात असताना रेकने प्लॅटफॉर्मचे बफर एंड तोडले. त्यामुळे प्लॅटफॉर्म १ चे नुकसान झाले.”, असं एस. गुगनेसन यांनी सांगितलं.

ठाण्यात पेट्रोल 1 रुपये
प्रति लिटरने विक्री

देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतू ठाण्यात पेट्रोल 1 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र हे पूर्णपणे सत्य असून पेट्रोल घेण्यासाठी येथे लोकांची लांबच लांब रांग आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त ठाण्यातील कैलास पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटर पेट्रोल दिले जात आहे. आज सरनाईक यांचा जन्मदिवस आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.