उत्तर जपानमधील थंडगार समुद्र आणि एका राष्ट्रीय उद्यानाच्या खडकाळ किनारी भागातून बाहेर काढण्यात आलेले १० जण मरण पावल्याचे बचाव पथकातील लोकांनी सांगितले. पर्यटकांची एक नौका खवळलेल्या समुद्रात बुडाली होती. या बोटीला समुद्रात कसे जाऊ देण्यात आले, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
ही नौका बुडत असल्याचा संकटकालीन संदेश त्यावरील नाविकांनी दुपारी पाठवला होता.
काशुनी धबधब्याजवळील ठिकाण खडकाळ किनारा आणि जोरदार लाटा यामुळे बोटींच्या हालचालींसाठी कठीण असल्याचे मानले जाते.
१९ टनांची काझु-१ ही नौका शिरेतोको द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ संकटात सापडली, त्यावेळी तिच्यात २ कर्मचारी आणि २ मुलांसह २४ प्रवासी होते. या दुर्घटनेत बळी गेलेले ७ पुरुष व ३ महिला असे दहा जण प्रौढ होते, असे तटरक्षक दलाने सांगितले.
गेल्या वर्षी दोन अपघात झालेल्या बोट ऑपरेटरची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे वाहतूक मंत्रालयाने सांगितले. सहा गस्ती नौका, विमाने आणि पाणबुडे यांच्या मदतीने रात्रभर शोध घेण्यात आल्यानंतर, बचाव पथकांना रविवारी पहाटे शिरेतोको द्वीपकल्पाच्या टोकाजवळ ४ लोक आणि नंतर त्याच भागात ६ लोक सापडले. नौकेने संकटकालीन संदेश पाठवला, तेथून हे ठिकाण उत्तरेकडे १४ किलोमीटरवर आहे.