विलीनीकरणाची मागणी, तसेच आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती न दाखविणे या कारणांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक घरावर केलेल्या हल्ल्यात सामील ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.
जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडूनही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडूनही अहवाल मागवण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.
एसटीच्या कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी ११५ एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना अटक केली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली. या कर्मचाऱ्यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. तसेच त्यांच्यावर पोलीस कारवाईही झाली आहे. त्यामुळे महामंडळाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत त्यांची नोकरी जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही कर्मचारी हे बडतर्फ आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती, त्यांना कामावर परतण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत होती, परंतु जे कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत आणि त्यांनी प्रथम अपील केले आहे, त्यांना न्यायालयाच्या आदेशापासून चार आठवडय़ांच्या आत ताकीद देऊन निकाली काढण्यात येत आहे, तसेच ज्यांनी प्रथम अपील केलेले नाही, अशा कर्मचाऱ्यांना तीन आठवडय़ांची मुदतही देण्यात आली आहे. ही मुदत २८ एप्रिलपर्यंत आहे. तरीही यातील कर्मचाऱ्यांना संधी मिळणे कठीण आहे.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी, गुन्हे दाखल असलेल्या या ११५ एसटी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यातील काही कर्मचारी बडतर्फ आहेत, तर काही कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाई झालेली नाही. कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिल ही शेवटची मुदत होती. ती मुदतही उलटली आहे. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई ही होईलच, असेही ते म्हणाले.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन शमले असतानाच दिवाळीनंतर याच मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्याआधी राज्यभरातील आगारांमध्ये आंदोलनासाठी मोर्चेबांधणी केली जाणार आहे. एसटी लढा विलीनीकरणाचा महाराष्ट्र राज्याचे सदस्य सतीश मेटकरी यांनी विलीनीकरणासाठी राज्यातील प्रत्येक आगारात कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.