आंब्यांचा हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला असला, तरी अद्याप हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही. किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचा दर एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत. अक्षय तृतीयेसाठी बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, ती अपेक्षेएवढी नसल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
आंब्यांचा हंगाम मार्च महिन्यापासून सुरू झाला. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही. कोकणातील हवामान बदलाचा फटका आंब्याला बसला. त्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणात पुन्हा पावसाळी वातावरण आहे. काही भागांत पाऊसही झाला आहे. अक्षय तृतीयेसाठी पुणे, मुंबईसह राज्यभरातून आंब्याला मागणी वाढू शकेल. पण, अद्याप आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंब्यांचे दर प्रतवारीनुसार ९०० ते १२०० रुपये दरम्यान आहेत.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२४ एप्रिल) कोकणातून दहा हजार पेटी हापूसची आवक झाली. कर्नाटकातून दोन डझन आंब्यांच्या दहा हजार खोक्यांची आवक झाली. अक्षय तृतीयेसाठी आंब्यांची आवक वाढली आहे.
मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याची आवक कमी असल्याचे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. आंब्याची आवक वाढली असली, तरी अद्याप आंब्यांचे दर चढे आहेत. पाच ते सहा डझनच्या पेटीमागे घाऊक बाजारात ५०० रुपयांपर्यंत दर घटले असले, तरी किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचे दर प्रतवारीनुसार ९०० ते १२०० रुपयांपर्यंत आहेत. अक्षयतृतीयेसाठी किरकोळ बाजारातील खरेदीदारांनी आंबे खरेदी सुरू केली असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
कर्नाटक आंब्यांच्या दोन डझनाच्या १० ते १२ हजार खोक्यांची आवक झाली. लालबाग, बदाम, पायरीची एकूण मिळून पाचशे ते एक हजार क्रेट्सची (प्लास्टिक जाळी) आवक झाली. कर्नाटक आंब्यांच्या चार ते पाच डझनाच्या पेटीचे दर ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. अक्षय तृतीयेनंतर आंब्यांची आवक आणखी वाढेल, असे कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.