चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल पहायला मिळत आहेत. ब्लूमबर्गने सादर केलेल्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी जीडीपी 9.3 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसारल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.
या अहवालामध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीवर कोरोनाचे सावट होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लॉकडाऊन लावण्यात आले होते. सर्व उद्योगधंदे बंद होते. त्याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला. याकाळात रोजगारामध्ये देखील घट झाली होती. अनेकांनी आपले रोजगार गमावल्याने उत्पन्नात देखील घटले. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने पुन्हा एकदा उद्योगधंदे नव्या जोमाने सुरू झाले. त्याचा मोठा फयदा हा अर्थव्यवस्थेला झाला. परिणामी तीसऱ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी हा 8 टक्क्यांच्या वर पोहोचल आहे. कोरोनाची तिसरी लाट न आल्यास चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी 9.3 टक्क्यांवर पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, येणाऱ्या काळात वस्तू आणि उत्पादनाच्या मागणीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण निर्माण होईल. याचा सर्वाधिक फायदा हा सर्व्हिस सेक्टरला होणार असल्याचा अंदाजही या रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे. तसेच 2022 आणि 2023 साठी सर्व गोष्टी सुरळीत राहिल्यास भारताचा जीडीपी हा अनुक्रमे 10.4 आणि 12 टक्के इतका असू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.