तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणीनंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या नीलेश दगडेने आपले नाव कोरले. या स्पर्धेत नीलेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ किलो वजनगटातील विजेते अनुक्रमे उमेश गुप्ता आणि अनिकेत पाटील यांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. त्याचा विजय अगदीच एकतर्फी झाला.
नीलेशकडून पराभूत झालेल्या उमेश गुप्ता (यू.जी. फिटनेस) आणि अनिकेत पाटील (सावरकर जिम) यांना पुढील काळात हा किताब जिंकण्यासाठी केवढी तयारी करावी लागेल याचे जणू पाठच शिकावयास मिळाले. उमेश त्याच्या ७० किलो गटामध्ये निर्विवाद विजेता होता, तीच गोष्ट ८५ किलो गटात अनिकेत पाटीलची होती. अनिकेतचे प्रमाणबद्ध शरीर त्याला अव्वल स्थान देऊन गेले.
अलीकडच्या काळात महिला व्यायामाकडे वळू लागल्याने त्यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा महिला वर्गाला प्रेरणादायी ठरू लागल्या आहेत. प्रेक्षकांमध्ये महिलांचे वाढते प्रमाण आणि प्रत्यक्ष सहभाग लक्षणीय ठरत आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवामध्ये हर्षदा पवार (हक्र्युलस फिटनेस) हिने आपले वर्चस्व राखताना आपल्याच जिममधील किमया बेर्डेला मागे टाकले. तर, महिलांच्या फिजिक स्पोर्ट्समध्ये रेणुका जनौतीने बाजी मारली.