आज दि.१५ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, आणखी एक सहकारी सोडणार साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे, कारण त्यांच्या आणखी एका सहकाऱ्यांने त्यांची साथ सोडली आहे. दीपक सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दीपक सावंत हे 2014 ते 2019 या काळात भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते, पण 2019 ला महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही.

याआधी सोमवारीही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आतापर्यंत 40 आमदार, 13 खासदार यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना साथ दिली आहे. निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला.

पुढचे तीन-चार तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या या भागांमध्ये वीजेच्या गडगडाटासह पावसाचा अलर्ट!

महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पुढच्या तीन-चार तासांमध्ये वीजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तसंच 30-40 किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहतील, अशी शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार नागपूर विभागात उद्यापासून 19 मार्चपर्यंत वादळी वारे, गारपीट तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 16 आणि 17 मार्च रोजी नागपूर, चंद्रपूर तसंच गडचिरोली या तीन जिल्हयात अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

शेतकऱ्याच्या लेकीचा कौतुकास्पद निर्णय! 17 वर्षांची शुभावरी करतेय सेंद्रिय शेती

शेती हा शेतकऱ्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. शेतकऱ्याची ओळख शेतीतूनच होते. अनेक तरुणही वेगवेगळ्या पद्धतीने शेतीत पिके घेत आहेत. तांत्रिक शेतीलाही तरुणाईची पसंती मिळत आहे. पण, उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात 17 वर्षांची मुलगी सेंद्रिय शेती करत आहे. सध्या जिल्ह्यात हा चर्चेचा विषय आहे.

शुभावरी भागातील एका छोट्या गावातील शुभवरी चौहान नावाची ही शेतकरी मुलगी गायी पाळते. शेण आणि मूत्रापासून ती देशी खत तयार करते आणि तिचा पिकांमध्ये वापर करते. त्यामुळे शेतात घेतलेले पीक पूर्णपणे सेंद्रिय बनते. या तरुणीला सेंद्रिय शेतीची आवड आहे.

मुलीला वाचवण्यासाठी आई रानडुकरांशी 30 मिनिटे लढली, पण शेवट भयानक झाला

छत्तीसगडमधील कोरबाच्या जंगलात मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान मागच्या 24 तासात पासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियामार गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय दुवासियाने तिची 11 वर्षांची मुलगी सुनीता हिच्यासह जवळच्या गावातील शेतात माती गोळा करण्यासाठी गेली होती.

माती खोदत असताना दोघांवर रानडुकरांनी हल्ला केला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी दुवासियाने आपल्या जिवाची पर्वा न करता रानडुकराशी लढा दिला. सुमारे अर्धा तास चाललेल्या दोघांमधील संघर्षात दुवासियाचा मृत्यू झाला. याचवेळी रानडुकराचाही जागीच मृत्यू झाला.

हाती तलवार, नजर करारी! अलका कुबल दिसणार ‘या’ ऐतिहासिक भूमिकेत

मराठी सिनेमांचा 80-90चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल.’चक्र’ सिनेमापासून सुरू झालेला प्रवास ‘माहेरची साडी’ सारख्या अनेक दर्जेदार सिनेमांपर्यंत येऊन पोहोचला.आजवर अनेक स्त्री प्रधान सिनेमे अलका कुबल यांच्या वाट्याला आले. त्यातून त्यांनी त्यांची नवी ओळख निर्माण केली.अभिनयात आपली छाप उमटवल्यानंतर अलका कुबल यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाय ठेवला.अलका कुबल नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणराणिगी राजमाता जिजाऊंची भूमिका त्या साकारणार आहेत.महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन, पुणे प्रस्तुत ऐतिहासिक महानाट्य “शिवशाही- मुद्रा भद्राय राजते” यात अलका कुबल जिजाबाईंची प्रमुख भूमिका साकारणार आहे.

“सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!

आज वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. देशात सध्या भाजपात या नाहीतर तुरुंगात जा, अशी परिस्थिती आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपात सामील व्हा नाहीतर तुरुंगात जा, अशी राज्याची स्थिती आहे. महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत असतो. ती दिशा दाखवण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. आपण दिशा दाखवणार आहोत की नाही? ही लढाई केवळ शिवसेनेची नाही. आता आपण एकत्र आलो आहोत. सरकार स्थापन होईल. यासाठी ही लढाई नाही. आपलं सरकार स्थापन होईलच. पण सरकार स्थापन कशासाठी करायचं, याचं उत्तरही आपण जनतेला द्यायला हवं.”

गौतम अदानींच्या घरी लगीनघाई! मुलगा जीतची दिवा जयमीनशी झाली एंगेजमेंट

उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीतचा साखरपुडा झाला आहे. जीत यांची रविवारी अहमदाबादमध्ये दिवा जयमीन शाहबरोबर एंगेजमेंट झाली. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत ही एंगेजमेंट झाली. अदानी कुटुंबाची होणारी सून ही एका प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे. सोशल मीडियावर जीत व दिवाचा एक फोटो समोर आला आहे.

ऑस्कर मिळाल्यानंतर सोशल मीडियावर ‘नाटू नाटू’चीच हवा

कलाविश्वातील सर्वाधिक मानाच्या मानल्या जाणाऱ्या ९५व्या अकादमी अवॉर्डची घोषणा सोमवारी(१३ मार्च) करण्यात आली. यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ऑस्कर मिळाला.

नाटू नाटूला ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा या गाण्याचे रील्स व्हायरल होताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत विराटने क्रमवारीत घेतली मोठी झेप

अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीची शानदार खेळी पाहायला मिळाली. कोहलीने ३६४ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावांची खेळी केली. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळानंतर शतक झळकावले. या शतकासह त्याने कसोटी क्रमवारीत ८ स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता तो आयसीसी कसोटी क्रमवारीत ७०५ रेटिंगसह १३व्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या या खेळीतून त्याला ५४ रेटिंग मिळाले.कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही कसोटी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. आता तो ७३९ रेटिंगसह १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, आर अश्विन गोलंदाजीत अव्वल स्थानावर आहे, त्याने जेम्स अँडरसनला ८६९ रेटिंगसह मागे टाकले आहे. रवींद्र जडेजा ४३१ रेटिंगसह अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.