पुणेकर लक्ष्मण नरसिंहन होणार स्टारबक्सचे नवे CEO

विदेशी कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होण्याची प्रथा कायम आहे. जगातील प्रमुख कॉफी कंपनी असलेल्या स्टारबक्सच्या सीईओपदी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरसिंहन हे मावळते सीईओ हॉवर्ड शुल्ट्झ यांची जागा 1 ऑक्टोबरपासून घेतील. तर, शुल्ट्झ हे एप्रिल 2023 पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील. आपल्यासाठी विशेष बाब म्हणजे नरसिंहन यांचा जन्म पुण्यात झाला असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातूनच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

‘हिंदुस्थान टाईम्स’नं दिलेल्या वृत्तानुसार इंडिपेंडेंट स्टारबक्स बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या अध्यक्षा मेलोडी हॉबसन यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी लक्ष्मण नरसिंहन यांचं ‘प्रेरणादायी नेता’ असं वर्णन केलं आहे.  “त्यांचा सखोल आणि दांडगा प्रत्यक्ष अनुभव जगभरातील ग्राहक असलेल्या या स्टारबक्सच्या बिझनेसमध्ये धोरणात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल. त्यांची सीईओ पदासाठी निवड करणं हे स्टारबक्सच्या वाढीला गती देण्यासाठी आणि भविष्यात आम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिनं महत्त्वाचं ठरेल,” असं त्या म्हणाल्या.

सध्याचे सीईओ हॉवर्ड शुल्ट्झ यांनी सांगितलं की, “मला लक्ष्मणच्या रिलोकेशनबद्दल कळालं तेव्हा स्टारबक्सचा व्यवसाय प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी ते योग्य व्यक्ती असल्याची मला खात्री झाली. या बिझनेसला नवीन आकार देण्यासाठी, त्यांच्या पार्टनर सेंटर्ड दृष्टिकोनातून कंपनीला पुढे नेण्यासाठी आणि मॅच्युअर आणि इमर्जिंग मार्केटमध्ये वाढीचं ट्रॅक रेकॉर्ड निर्माण करण्यासाठी लक्ष्मण यांची निवड उत्तम ठरेल.”

नरसिंहन लंडनमधून सिएटल भागात रिलोकेट होतील आणि 1 ऑक्टोबर रोजी नवीन सीईओ म्हणून स्टारबक्समध्ये रुजू होतील, असं कंपनीने म्हटलंय.

कोण आहेत लक्ष्मण नरसिंहन?

– लक्ष्मण नरसिंहन हे भारतीय वंशाचे अमेरिकी असून, सप्टेंबर 2019 मध्ये रेकिटमध्ये रूजू झाले. 1999 मध्ये ही कंपनी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच नरसिंहन यांनी बाहेरून येत कंपनीची धुरा सांभाळली.

– 55 वर्षांचे लक्ष्मण यांनी पेप्सिकोमध्ये ग्लोबर चिफ कमर्शिअल ऑफिसर म्हणून अनेक लीडरशीपसंबंधी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

– त्यांनी कंपनीच्या लॅटिन अमेरिका, युरोप आणि सब-सहारन आफ्रिका ऑपरेशन्सचे सीईओ आणि या पूर्वी पेप्सिको लॅटिन अमेरिकेचे सीईओ आणि पेप्सिको अमेरिका फूड्सचे सीएफओ म्हणूनही काम केलं आहे.

– याआधी नरसिंहन मॅकेन्झी अँड कंपनीत सीनिअर पार्टनर होते. ते ब्रुकिंग्ज इन्स्टिट्युटचे ट्रस्टीदेखील आहेत.

– नरसिंहन यांनी यूकेच्या पंतप्रधानांच्या बिल्ड बॅक बेटर कौन्सिलचे सदस्य म्हणूनही काम केलं आहे आणि व्हेरिझॉन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे ते सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.