‘पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, तो झाल्यास चाळीसही आमदार..’; शिवसेना खासदाराचा दावा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर दसरा मेळाव्यावरून दिपक केसरकर यांच्यावरही पलटवार केला आहे. याशिवाय त्यांनी उदय सामंत यांनाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे.

विनायक राऊत म्हणाले, की अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.. मेळघाटामध्ये कृषिमंत्री गेले, तरी त्याचा काही फायदा नाही. अद्याप याठिकाणी पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा दौरा कशासाठी? शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे.

भाजपने मुंबईमध्ये हिंदुत्वाचे जे बॅनर लावलेत ही भाजपची पूर्णपणे नौटंकी आहे.. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी निर्बंध आणून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाचे बेगडी दर्शन घडवू नये, असा आहे इशारा राऊतांनी दिला आहे.

राऊत मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना म्हणाले, की चाळीसही आमदारांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कदापिही होणार नाही.. जर तो करण्याचा प्रयत्न झाला तर हे चाळीसही आमदार एकामेकांच्या उरावर बसतील.

दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, की दीपक केसरकारांनी आमची चिंता करू नये. भाजपच्या लोकांचे पाय चेपून मिळवलेलं मंत्रिपद पहिल्यांदा सांभाळा.. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चिंता करू नका. दसरा मेळावा घेण्याचा फक्त आणि फक्त अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे आणि त्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळेल. तो होईलच, असा पलटवार दीपक केसरकर यांच्यावर विनायक राऊतांनी केला आहे. दीपक केसरकर विचित्र माणूस आहेत. सकाळी बोललेलं संध्याकाळी त्यांना आठवत नाही, असं सांगत दीपक केसरकर यांची विनायक राऊतांनी खिल्ली उडवली आहे.

पुढे राऊत म्हणाले, की उदय सामंतांनी आम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. आदित्य ठाकरे यांची सभा पुण्यात होती तेथे येण्याची उर्मी उदय सामंताना झाली होती आणि त्याच्यातून घडलेला हा सगळा प्रकार होता. त्यामुळे उगाचच नौटंकी करून सेनेला आव्हान द्याल तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला चांगले माहिती आहे, असा इशारा उदय सामंताना दिला आहे. उदय सामंतांनी पुण्यामध्ये हल्ला झालेल्या ठिकाणी सभा घेण्याचे आव्हान दिले होते. यावर राऊत यांनी त्यांचा चांगला समाचार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.