श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही असं फार पूर्वीपासून म्हणण्याची प्रथा आहे. कधीकधी अति विश्वास ठेवणंही धोक्याचं ठरू शकतं. याची प्रचिती आली आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. एखाद्या सिनेमापेक्षाही रंजक पद्धतीनं पोलिसांनी हा गुंता सोडवला आणि अखेर आरोपींचा खरा चेहरा गावकऱ्यांच्या समोर आणला.
नेमकं काय प्रकरण?
एका व्यक्तीने त्याच्या मुलासोबत मिळून ऑनलाईन मूर्ती खरेदी केली. त्या मूर्ती वडील आणि मुलगा दोघांनी मिळून शेतात लपवली. त्यानंतर जेव्हा अशोक पेंटर यांनी जेव्हा आपल्या शेतात खोदकाम केलं तेव्हा त्यांना पितळीच्या मूर्ती सापडल्या. महालक्ष्मी, रसस्वती, कुबेराची मूर्ती यामध्ये होती.
वडील आणि मुलाने हा साक्षात चमत्कार असल्याचं गावातील लोकांना भासवलं. ग्रामस्थांना इथे मंदिर उभं करुया हे संकेत असल्याचं वडील-मुलाने सांगितलं. गावातील भोळ्या भाविकांच्या भावनांचा खेळ मांडला. जेव्हा ही घटना पोलिसांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. तेव्हा वडील आणि मुलाचं बिंग फुटलं. या दोघांनी ऑनलाईन 169 रुपयांना मूर्ती खरेदी केल्या होत्या, त्या शेतात लपवल्या होत्या हे सत्य समोर आलं. त्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वडील आणि मुलाला जमिनीत मूर्ती असल्याचे दोन दिवसांपासून स्वप्नात दिसत असल्याचं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून शेतात खोदकाम करण्यात आलं. तिथे पितळीच्या मूर्ती आढळून आल्या. या मूर्ती म्हणजे देवाचा साक्षात्कार असल्याचं त्यांना ग्रामस्थांना पटवून दिलं होतं.
मात्र तसं नसून आरोपी वडील-मुलाने त्या शेतात लपवल्या होत्या. वडील-मुलाला तिथे मंदिर उभं करून धर्माच्या नावाखाली पैसे उकळायचे होते म्हणून हा सगळा कट रचल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं. त्यामुळे ग्रामस्थांचाही संताप झाला. त्यांनी नागरिकांना बाजूला करून वडील आणि मुलाला अटक केली आहे.
ही धक्कादायक घटना उन्नाव इथल्या आसीवन पोलीस ठाणा क्षेत्रात घडली आहे. पोलिसांनी जेव्हा कुरिअर बॉयकडे चौकशी केली तेव्हा त्यांना वडील-मुलाने या मूर्ती ऑनलाइन मागवल्याचा क्ल्यू मिळाला. त्यावरून तपास सुरू झाला आणि वडील-मुलाचं बिंग फुटलं.