भारताने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही गमावली

सुमार गोलंदाजी आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या धावा यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा सात विकेट राखून पराभव केला. भारताने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता शेवटची वनडे रविवारी होणार आहे. भारताने विजयासाठी दिलेले 288 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने अगदी आरामात पार केले.

सलामीवीर क्विंटन डि कॉक (78) आणि जानेमन मालान (91) यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी करुन विजयाची पायाभरणी केली. शार्दुल ठाकूरने डिकॉकला पायचीत करुन ही जोडी फोडली. भारताला दुसरा विकेट 212 धावांवर मिळाला. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. मार्कराम आणि डुसेने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. फलंदाजांनी चूका केल्याच पण गोलंदाजही प्रभावी ठरले नाहीत. तिथेच भारताचा पराभव निश्चित झाला. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना हैराण केलं. पण तेच भारताचे फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरले.

मागच्या वनडेमधील चुकांची पुनरावृत्ती या सामन्यात दिसून आली. सलामीला आलेल्या शिखर धवन आणि राहुल जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. 63 धावांवर धवनच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. त्यानतंर विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. पुन्हा एकदा भारताचा डाव गडगडतो की, काय असे वाटत असतानाच ऋषभ पंतने (85) जबाबदारीने खेळ केला. लोकेश राहुल (55) सोबत त्याने शतकी भागीदारी रचली.

शिखर-राहुल त्यानंतर पंत-राहुल मैदानावर असेपर्यंत भारत मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण या जोड्या फुटल्यानंतर मधली फळी डळमळली. श्रेयस अय्यरला आज पुन्हा एकदा चांगली संधी होती. पण 11 धावांवर तो स्वस्तात बाद झाला.

पहिल्या वनडेमध्ये बॉलऐवजी बॅटने कमाल दाखवणाऱ्या शार्दुल ठाकूरने आज पुन्हा एकदा संघासाठी 38 चेंडूत नाबाद 40 धावांची महत्त्वाची खेळी करुन महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी केलेली नाबाद 48 धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. अश्विनने 24 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.