बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अॕड. आशिष राय यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर तक्रार दाखल केली आहे. राय यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे नोंदवली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या शवविच्छेदनाच्या वेळी कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पॅनेलने आणि मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र शवविच्छेदना दरम्यान अनेक दोष आढळून आले आहेत. त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. तसेच देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांनाही तपासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा व्हिसेरा योग्यरित्या जतन केला गेला नाही, हे निष्काळजीपणा आहे. कूपर हॉस्पिटलने सुशांत सिंगच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी केलेली नाही.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे शवविच्छेदन घाईघाईत करण्यात आले. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टममध्ये सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या टीमवर दबाव आणला. मृतदेहाच्या शवविच्छेदनादरम्यान दोन्ही प्रशासन आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे या प्रकरणात दिसून येते. अभिनेता सुशांतच्या दिवंगत मृतदेहाची प्रतिष्ठा आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले गेले नाही, आदि आरोप तक्रारीमध्ये करण्यात आले आहेत.
सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतने आत्महत्या केली तेव्हा त्याचे मित्रही घरी उपस्थित होते. बराच वेळ सुशांत आपल्या रुममधून बाहेर आला नाही. मित्रांनी खोलीचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेवटी दरवाजा तोडून मित्रांनी आत प्रवेश केला असता सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. यानंतर वांद्रे पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.