आज दि.२ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मी आता सरेंडर होण्यासाठी
जातोय : नितेश राणे

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तसेच, ते आता न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. काल सेशन कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्या निकालाचा आदर ठेवून मी आता सरेंडर होण्यासाठी जातोय. राज्य सरकारने वेगवेगळ्या बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. आज स्वत:हून, कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी स्वत: सरेंडर होण्यासाठी जात आहे.” असं नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितलं. यानंतर ते कोर्टाच्या दिशेने रवाना देखील झाले. भाजप आमदार राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा
ऑफलाईन होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा सर्वांच्या मनात धडकी भरवली होती, त्यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी जोर धरत होती. मात्र आताचे लेटेस्ट आकडे पाहिल्यास कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसतंय आणि गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदच्या परीक्षा तरी ऑफलाईन घ्याव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जळगाव मध्ये थंडीमुळे
चार जणांचा रस्त्यावर मृत्यू

जळगावमध्ये मृत पावलेले चारही जण भीक मागून उदरनिर्वाह करायचे. त्यातील एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौक, एकाचा मृतदेह निमखेडी रस्त्यावर, एकाचा मृतदेह रेल्वे स्टेशनवर तर एकाचा मृतदेह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. या चारही जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजून त्यांची साधी नावे सुद्धा प्रशासनाला कळू शकली नाहीत. मृत पावलेले चारही जण रस्त्याच्या कडेला झोपले होते. सोमवारी मध्यरात्री तापमान साडेसात अंशावर गेले. या चौघांच्या अंगावर साधे पांघरुणही नव्हते. थंडीमुळेच त्यांचा गारठून मृत्यू झाल्याचे समजते.

डोंबिवलीतील धोकादायक १५६
कारखाने हलवण्याचा निर्णय

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि वादाचा विषय ठरलेला धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतराचा मुद्दा अखेर संपुष्टात आला आहे. राज्य सरकारने डोंबिवलीतील असे १५६ रासायनिक कारखाने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक अशा कारखान्यांचा यात आहे.

आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील
तिन्ही समुद्रात फेकून देऊ : आठवले

भाजपा सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे, असं वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं होतं. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त करत त्यांनी ही टीका केली. राव यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ असं म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ,” असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

राज्यभर ‘महाडीबीटी’ पोर्टल
हँग, शिष्यवृत्ती फार्म भरण्यात विलंब

राज्यभर ‘महाडीबीटी’ (MahaDBT) पोर्टल कधी संथ, तर कधी हँग झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता आले नाहीत. त्यामुळे या शिष्यवृत्तींसाठी अर्ज भरायला मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे.

प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी
रूग्णालय उभारण्यात येणार

राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान 30 बेडचे एक रूग्णालय उभारण्यात येणार आहे. या महामंडळाच्या दहा किलोमीटरपुढे एक रूग्णालय ही अट असून आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

ओबीसी राजकीय आरक्षण
विधेयकाला राज्यपालांची मंजुरी

हिवाळी अधिवेशनात सदस्यांनी एकमताने मंजूर केलेल्या ओबीसी राजकीय आरक्षण विधेयकाला अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकावर त्यांनी सही केल्यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. हिवाळी अधिवेशनात सभागृहात सर्व सदस्यांनी एकमताने ओबीसी राजकीय आरक्षण विधेयक मंजूर केले होते. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या विधेयकावर राज्यपाल कोश्यारी यांनी सही केली नव्हती.

अमेरिकेत HIV लसीच्या
मानवी चाचणीला सुरवात

HIV अर्थात एड्स हा एक असा आजार आहे ज्यावर अद्याप कोणतंही औषध सापडू शकलेलं नाही. जगभरातील संशोधक गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर संशोधन करत आहेत. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय. अमेरिकेत HIV लसीच्या मानवी चाचणीला सुरवात झाली आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.