ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

२०१३ साली रमेश देव यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ असे त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००६ साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.