रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये उतरण्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून त्यांनी त्यासंबंधी घोषणा केली. उमेदवारीसाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या रिपब्लिकन नेत्या ठरल्या आहेत. अमेरिकेत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये निवडणूक होईल. आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी, सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, आपला देश आणि आपला अभिमान यांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिकेला आता नवीन पिढीतील नेतृत्वाची गरज आहे, असा दावा ५१ वर्षांच्या हॅले यांनी या व्हिडीओ संदेशामध्ये केला. हॅले या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या दोन वेळा गव्हर्नर होत्या तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. निकी हॅले यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत.
दुसरीकडे विवेक रामस्वामी या भारतीय वंशाच्या अमेरिकी उद्योजकाकडे निकी हॅले यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. बायोटेकचे संस्थापक असलेले विवेक रामस्वामी गेल्या काही काळापासून अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. हवामान बदल आणि वर्णभेदासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ावर त्यांनी अनेकदा वृत्तवाहिन्यांवर रिपब्लिकन पक्षाची बाजू मांडली आहे. हॅले यांच्याप्रमाणेच रामस्वामी यांचेही आई-वडील भारतातून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचा जन्म सिनसिनाटी येथे झाला आहे. हार्वर्ड आणि येल या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून त्यांचे शिक्षण झाले आहे आणि त्यांची संपत्ती ५० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे.