मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. आज महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात 11 महिलांचा समावेश आहे. नव्या विस्तारात उत्तर प्रदेशाच्या वाट्याला सर्वाधिक सात मंत्रिपदे गेली आहेत. तर महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदं आली आहेत. त्यात नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वात आधी नारायण राणे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हिंदीत आणि ईश्वर साक्षीने शपथ घेतली.
ध्याच्या घडीला शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांची नावे घ्यायची झाली तर त्यामध्ये नारायण राणे हे नाव अग्रस्थानी असेल. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. कट्टर शिवसैनिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपद… नारायण राणे यांची राजकीय कारकिर्द अशी राहिली आहे. सुरुवातीला चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्यव्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला.
1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी या पदाची धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळाले. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कराड यांची ओळख आहे. त्यांच्यामुळेच कराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तीनवेळा नगरसेव, औरंगाबादचे माजी महापौर ते केंद्रीय मंत्री असा कराड यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. डॉ. भागवत कराड आणि त्यांची पत्नी डॉ. अंजली कराड दोघांनीही डॉ. वाय. एस. खेडकर यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. 1990 मध्ये ‘डॉ. कराड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’ या नावाने हॉस्पिटल सुरु केले. अनेक वर्षे रुग्णसेवा केल्यानंतर 1995 साली औरंगाबाद महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यांच्याव भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. आता केंद्रीय मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 खासदारांना संधी देण्यात आलीय. त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार भारती पवार यांचाही समावेश करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे भारती पवार यांनी केंद्रीय मंत्रीपदासाठी अचानक नाव समोर आलं. त्यानंतर काही वेळापूर्वी जाहीर झालेल्या 43 जणांच्या यादीत भारती पवार यांचं नाव पाहायला मिळालं. याबाबत भारती पवार यांना विचारला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. भारती पवार यांनी 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.