26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विषयी जाणून घ्या..

गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशभरातील नक्षलवादाला मोठा हादरा बसला आहे. गडचिरोली पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली गेलीय. ही कारवाई गडचिरोलीतल्या आहेरीमधील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलीय. या कारवाईमुळे सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशावेळी सोमय मुंडे यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हा प्रवास सोमय मुंडे यांनीच एका खासगी कार्यक्रमात सांगितला होता.

सोमय विनायक मुंडे हे नांदेडच्या देगलूरमधील आहेत. मुंडे यांनी आयआयटीमधून एमटेक केलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये झालं. पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूरमधून केलं. सोमय यांनी एमटेकची पदवी आयआयटी मुंबईतून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मार्ग बदलला आणि ते यूपीएससीकडे वळाले. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यांना यश मिळालं.

चार वर्षापूर्वी मी आयआयटीतून पदवीधर झालो होतो. एका आयआयटीयनला वाटतं की जग पूर्ण त्याच्या पायथ्याशी आहे. त्याला भरपूर पगार असते, एखाद्या एमएनसीची ऑफर असते. तसंच मला होतं. मला चांगली ऑफर होती. वाटत होतं की आपली गाडी रुळावर आहे, म्हणजे आपण जसं ठरवलं होतं तशी जात आहे. जे मी ठरवलं होतं तसंच होत होतं. जसं प्लॅन केलं तसंच करिअर चालत होतं. पण मनाला काही शांती नव्हती. मन तरीपण चलबिचल होतं.

मन चलबिचल असण्याचं कारण शोधायला सुरुवात केली तेव्हा मला माहिती होतं की त्याचं कारण काय आहे. मी माझ्या सिनियर्सची वाटचाल बघत होतो. ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत होते, एक-दोन वर्ष जॉब केला होता त्यांनी. ते पाहून वाटत होतं की बाबा अशी लाईफ मला नकोय. ते 9 वाजता ऑफिससाठी निघतात. मुंबईची ट्राफिक, नेव्हिगेट करुन ते कसेतरी आपल्या फोर बाय फोरच्या क्युबिकलमध्ये पोहोचतात. 9 ते 5 ते आपल्या कम्प्यूटरसमोर काम करतात. त्यांचं जीवनात ध्येय असतं की बाबा अजून चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची, कसं अजून चांगलं प्रमोशन घ्यायचं. मला हे ध्येय नको होतं, मला अजून पुढे जाऊन काहीतरी करायचं होतं.

2008 मध्ये मी कॉलेजला होतो. फर्स्ट ईअरला होतो. मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता 26/11 चा, मुंबईत होतो मी. पूर्ण मुंबईला या 10 अतिरेक्यांनी वेठीस धरलं होतं. पूर्ण भारत टीव्हीसमोर बसून हे सगळं चित्र पाहत होता, आमच्या कॉलेजमध्ये कुणाला काही फरक पडला नाही. कुणाला काही वाटलं नाही की बाबा काय चालू आले. त्यावेळी मला वाटलं की आपण आपल्या समाजापासून इतके कसे कटऑफ होऊ शकतो. आपल्या समाजात येवढे प्रॉब्लेम्स आहेत, बेरोजगारी, गरीबी, जे पण तुम्ही म्हणा… अतिरेकी हल्ले होतात. या सगळ्यासोबत फाईट करण्याची इच्छा होती. ती एक तीव्र मनामध्ये होती.

सैनिक स्कुल आणि मिलटरी स्कुलमध्ये अभ्यास केल्यामुळे युनिफॉर्मची आवड एक लहानपासूनच मनात होती. पण प्रॉब्लेम हा होता की मी एका कॉर्पोरेट जगाचं शिखर चढत होतो आणि मला माहिती होतं की बाबा हे शिखर कसं चढायचं आहे. मला माहिती होती की यात अडथळे कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत आणि कसं आपण चालत चालत वर-वर हळूहळू पोहोचायचं. पण दूर कुठेतरी एक यूपीएससीचं, आयपीएसचं एक शिखर दिसत होतं. असं ढगापेक्षा उचं काही शिखर असतात ना तसं एक शिखर होतं ते. माहिती नव्हतं की बाबा आपण हे शिखर चढू शकतो की नाही.

या दोन शिखराच्या मध्ये एक मोठी दरी होती. ती अपयशाची दरी होती म्हणा. असे अनेक अनुभव आम्ही ऐकले होते आमच्या सिनियर्सकडून की बाबा किती खोल ही दरी आहे आणि या दरीत पडल्यावर काय काय होऊ शकतं. तरी पण म्हणतात ना की ये दिल है की मानता नही… तशीच एक इच्छा होती. तरुण मन जे असतं ते हृदयाचं ऐकत असतं, स्वत:च्या बुद्धीचं जास्त ऐकत नाही. त्यामुळे बजरंग बली की जय म्हणून मारली उडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.