दिव्यांगांना विवाहासाठी मिळणार 50 हजारांचे अनुदान

कोविड काळात लग्न करणाऱ्या दिव्यांगांना चक्क 50 हजारांचे अनुदान मिळणार आहे. ज्या दिव्यांगाचे लग्न 23 मार्च 2020 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत झाले आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेकरिता अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे (ZP) जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 17 जून 2014 रोजीच्या शासन निर्णयाअन्वये दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेत दिव्यांग व अव्यंग दांपत्यास विवाह केल्यास रूपये 50 हजार इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केले जाते. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विवाहानंतर एक वर्षाच्या आत संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र दिव्यांग दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील शहर परिसरातील गोठे व तबेले धारकांना 2022-2023 वर्षाकरिता परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढण्यासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, वाय. आर. नागरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नाशिक शहर परिसरासह गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, मानूर, वडनेरदुमाला, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पाथर्डी वडाळा (शिवार), त्र्यंबक खुर्द, कामटवाडे, चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विना परवाना गुरे बाळगल्यास 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षेची तरतुद करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचनेद्वारे नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे आणि त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) अधिनियम 1976 हा कायदा लागू केला आहे. या कायद्यान्वये विना परवाना गुरे पाळणे, गुरांची ने आण करणे गुन्हा असल्याने, महानगरपालिका क्षेत्रातील गोठे आणि तबेले धारकांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत दिलेल्या मुदतीत परवाना नूतनीकरण न केल्यास प्रती जनावर 5 रुपये इतके विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

परवाना नूतनीकरण व नवीन परवाना काढणे याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय शासकीय दूध योजना आवार, त्र्यंबक रोड, नाशिक 422002 या पत्यावर अथवा 9552621893 या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.