आज दि.२ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

दररोज दोन ते तीन तास अभ्यास करून पुण्यातील स्वराली राजपूरकरला दहावीच्या परीक्षेत मिळाले १०० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. ९३.८३ टक्के इतका निकाल लागला असून दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे.यामध्ये राज्यभरात १०० टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याची संख्या १५१ इतकी असून त्यामध्ये पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्या स्कूलमधील स्वराली राजपूरकर या विद्यार्थिनीला १०० टक्के मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वराली राजपूरकर हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, मी वर्षभर दररोज दोन ते तीन तास अभ्यास करीत राहिले. त्यामुळे मला ९५ ते ९८ च्या दरम्यान मार्क मिळतील अशी अपेक्षा होती. पण आज ऑनलाईन रिजल्ट पाहिला. त्यावेळी १०० टक्के मार्क मिळाल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता.

हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही

भारतीय हवामान खात्याने राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील असे भाकित केले होते, पण हवामान खात्याने त्याचे रंग बदलले. येत्या रविवारपर्यंत पावसाच्या सरी नाही तर उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.हवामानखात्याने आता विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. या तीन दिवसांत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेही मुंबई कोकण पट्ट्यांमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. मात्र, दुपारी दोनपर्यंत उष्णतेच्या झळा असल्या तरीही त्यानंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनचा प्रवास आता वेगाने पुढे पुढे जात आहे. आतापर्यंत तो बंगालचा उपसागर आणि अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात ताटकळत होता.

आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

२९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये, म्हणून चोख नियोजन करण्याचे आदेश गुरूवारी ( १ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.पंढरपूरच्या वारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध अधिकारी उपस्थित होते. यावर्षी वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विषेश नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

राहुल गांधींचा ‘या’ मुद्यावर मोदी सरकारच्या धोरणाला पाठिंबा

गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. यांच्या संघर्षात भारताने द्विपक्षीय धोरण स्वीकारले आहे. याबाबत राहुल गांधींना अमेरिकेत प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी यांनी भारतातील केंद्र सरकाराने स्वीकारलेल्या धोरणाला समर्थन दर्शवले आहे. राहुल गांधी सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आज ते अमेरिकेच्या राजधीनीतील थिंक टँक समुदाय आणि पत्रकारांशी संवाद साधत होते.“आमचे रशियाशी संबंध आहेत. त्यांच्यावर आमची काही अवलंबित्वे आहेत. त्यामुळे माझी भारत सरकारसारखीच भूमिका असेल. शेवटी आम्हाला आमच्या हितसंबंधांचाही विचार करावा लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध महत्त्वाचे असल्याचेही गांधींनी नमूद केले. “संरक्षण संबंध असणे महत्वाचे आहे. परंतु मला वाटते की आपण इतर क्षेत्रांचा (सहकाराचा) विचार केला पाहिजे,” असंही ते पुढे म्हणाले. यावेळी गांधींनी भारतातील प्रेस आणि धार्मिक स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अर्थव्यवस्थेची स्थिती यासह अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

केवळ बांगलादेशी असल्याच्या संशयावरून दोन वर्षांचं मूल असलेलं जोडपं तब्बल ३०१ दिवस तुरुंगात

भारतीय संविधानानुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला देशात कुठेही मुक्तपणे जाण्याचा अधिकार आहे. मग त्याचं कारण पर्यटन असेल किंवा रोजगार, प्रत्येकाला देशातील कोणत्याही भागात राहता येतं, फिरता येतं. मात्र, २ वर्षांचं मुल असलेल्या पश्चिम बंगालमधील एका जोडप्याला बंगळुरूमध्ये केवळ बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तब्बल ३०१ दिवस तुरुंगात रहावं लागलं. हे जोडपं रोजगारासाठी पश्चिम बंगालमधून कर्नाटकात स्थलांतरीत झालं होतं. अखेर गुरुवारी (१ जून) न्यायालयाने जामीन मंजूर झाल्यावर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.पलाश आणि शुकला अधिकारी रोजगारासाठी आपल्या दोन वर्षांच्या मुलासह जुलै २०२२ मध्ये बंगळुरूमध्ये आले. पोलिसांनी त्यांना बांगलादेशी असल्याच्या संशयावरून अटक केली. या जोडप्याने पोलिसांना आपण बर्धमान जिल्ह्यातील तेलेपूरकूर येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. तसेच दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

गौतम अदाणींनी घेतली शरद पवारांची भेट

गेल्या काही महिन्यांमध्ये गौतम अदाणी आणि अदाणी उद्योह समूह या दोन बाबी चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. हिंडेनबर्गनं दिलेल्या अहवालामध्ये गौतम अदाणींनी शेअर बाजारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर अदाणींचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यांचं जागतिक श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही मोठ्या प्रमाणावर घसरलं. या पार्श्वभूमीवर अदाणींशी संबंधित सर्वच व्यक्तींकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असताना आता गौतम अदाणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना त्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

इस्लाम भारतात सुरक्षित, बाहेरचे आक्रमक गेले, आता देशात आहेत ते आपलेच – मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने देशातील धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक सौहार्दाविषयी भूमिका मांडताना दिसत आहेत. गुरुवारी नागपुरात रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांनी देशातील धार्मिक स्थिती आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक घटनांचेही दाखले दिले. मोहन भागवत यांनी यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्य देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. “काही संप्रदाय बाहेरून आले होते. त्यांना आणणाऱ्या बाहेरच्या लोकांशी आपल्या लढाया झाल्या. पण आता ते बाहेरचे आक्रमक लोक निघून गेले आहेत. आता सगळे आतले लोक आहेत. त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांचे संबंध विसरून या देशात राहा. अजूनही जे लोक त्या बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली आहेत, तेही बाहेरचे नसून आपलेच आहेत, असं समजून त्यांच्याशी आपण चांगलं वर्तन करायला हवं. जर त्यांच्या विचार करण्यात काही कमतरता आहे, तरक त्यांचं प्रबोधन करणं आपली जबाबदारी आहे”, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.

द्वारकामाई मंदिर दर्शन वेळेत बदल; शिर्डी साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय

देशभरातील साई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने श्री द्वारकामाई मंदिराच्या दर्शनाच्‍या वेळेत बदल करण्‍यात आले असून गुरुवार, 1 जून 2023 पासून श्री द्वारकामाई सभामंडप साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार असल्‍याची माहिती साई संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.श्री क्षेत्र शिर्डी येथे देश-विदेशातून लाखो भाविक श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येत असतात. या ठिकाणी आल्‍यानंतर भाविक श्रींच्‍या समाधीसह द्वारकामाई, चावडी व गुरुस्‍थान आदी ठिकाणी प्राधान्‍याने दर्शनाकरिता जातात. बाबांनी त्‍यांच्‍या हयातीत संपुर्ण जीवन हे द्वारकामाई येथे व्‍यतित केले. आता रात्रीही द्वारकामाई खुले राहणार असल्याने रात्री उशीरा येणाऱ्या साईभक्तांना किमान द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपातून दर्शन घेता येणार आहे.

आघाडीत जागावाटपावरुन जुंपणार?

महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. नुकतेच ठाकरे गटानं कोल्हापूरच्या लोकसभेच्या दोन्ही जगावर दावा केला होता. अशात आता कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला आहे. आज मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बूथ कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी मुश्रीफ यांनी हा दावा केला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केल्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनीही दावा केला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यामुळे नेहमी आमच्याकडे राहिलेला हा मतदार संघ यावेळीही राहील असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

सिनेमाच्या शाळेत पहिला नंबर काढणारे नागराज मंजुळे दोनवेळा दहावीत झालेत नापास

महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे.. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. सध्या सगळीकडं दहावीच्या लग्नाची चर्चा आहे, अशातच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे दाहावीचं निकालपत्र सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. सिनेमाच्या शाळेत पहिला नंबर काढणाऱ्या या  दिग्दर्शकाला दहावीत नेमकी किती मार्कस मिळाले होते याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.आज दहावीचा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांचे दहावीच्या निकालपत्राची एक कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नागराज मंजुळे दाहावीत नापास झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात मोठ्या अक्षरात त्याच्यावर फेल (FAIL) असं लिहिलं आहे. ही गुणपत्रिका आज व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शनात अव्वल असलेले नागराज मंजुळे अभ्यासाच्या बाबतीत फारच कच्चे होते. सध्याएका मुलाखतीमध्ये देखील नागराज यांनी दहावीत ते नापास झाल्याचे सांगितले होते. पण निराश न होता मी दोनदा दहावीची परीक्षा दिल्यानंतर उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

भाजपच्या रडारवर आणखी एक शिंदे, भर सभेत दिली ऑफर!

माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना प्रत्यक्षरीत्या भाजपची ऑफर दिली आहे. मुख्य म्हणजे सुभाष देशमुख यांनी सुशील कुमार शिंदे यांच्यासमोरच ही ऑफर दिल्यामुळे सोलापुरातील राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून चाचपणी सुरू झाली आहे.गेल्या नऊ वर्षांपासून प्रणिती शिंदे आणि मी एकाच सभागृहात आहोत आणि त्यांनी सोलापूरची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आजच्या पुरस्काराचे नाव आहे, ‘द पॉवर ऑफ सोलापूर’ याप्रमाणेच माझे मत आहे. भविष्यकाळातही पॉवरमध्येच आमदार प्रणिती शिंदे यांनी राहावं, तरच आमच्या सोलापूरची पॉवर वाढणार आहे, अशा शब्दांत दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रणिती शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या ऑफर दिली. त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांची उपस्थिती होती.

एसीसीने पाकिस्तानला दिला झटका! एशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मागील काही महिन्यांपासून टीम इंडियाला एशिया कपसाठी पाकिस्तानमध्ये जाण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खळबळ उडाली आहे. पीसीबीने एशिया कपसाठी भारतापुढं काही विकल्प ठेवले आहेत. पण आता एशियन क्रिकेट काऊंसिलने नुकत्याचा घेतलेल्या एका निर्णयामुळं पाकिस्तानसमोर मोठा सवाल उपस्थित झाला आहे. पीसीबीने ठेवलेला हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव एसीसीने नाकारला आहे. या निर्णयानंतर आता पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की, पाकिस्तान टीम एशिया कपमध्ये सहभागी होणार नाही.भारत पाकिस्तानात एशिया कप खेळायला जाणार नाही, असा सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने याबाबत माहती दिली होती. त्यानंतर पीसीबी चेअरमन नजम सेठीने हायब्रिड मॉडलचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी सेठी म्हणाला, भारताला सोडून पाकिस्तान आणि इतर टीम त्यांचे सामने नियोजित ठिकाणावर खेळतील. त्यामुले पाकिस्तान बोर्डाने युएईमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, श्रीलंका आणि बांगलादेशने हा प्रस्ताव अमान्य केला होता.

भारताने पाकिस्तानला धूळ चारली! ज्यूनियर एशिया कपचा किताब जिंकून रचला इतिहास

भारतीय ज्यूनियर पुरुष हॉकी टीमने गुरुवारी झालेल्या ज्यूनियर एशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. आठ वर्षानंतर झालेल्या या टूर्नामेंटला पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेवटच्या क्षणी पाकिस्तानने आक्रमक खेळी केली होती. परंतु, भारताचा गोलकिपर मोहित एच एसने चमकदार कामिगिरी केल्यानं पाकिस्तानची रणनिती फोल ठरली. भारतासाठी अंगद बीर सिंगने १२ व्या मिनिटात तर अरायजीत सिंग हुंडलने १९ व्या मिनिटात गोले केले. तर भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रोलॅंट ओल्टमेंस यांच्या पाकिस्तानच्या संघाने ३७ व्या मिनिटात फक्त एकमेव गोल केला.

चेन्नई सुपर किंग्जसाठी खूशखबर! महेंद्रसिंग धोनीची गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी १ जूनला गुडघ्याची शस्त्रक्रिया केली. आयपीएलच्या १६ व्या हंगामात धोनीला गुडघ्याच्या दुखापतीनं त्रस्त केलं होतं. आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर ४८ तासांच्या आतच धोनीने मुंबईच्या डॉक्टरांना संपर्क केला. धोनीने ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी बुधवारी ३१ मे रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल झाला होता. आता गुरुवारी सकाळी आठ वाजता त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीनं दिनशॉ पारदीवाला यांना या समस्येबाबत सांगितलं. दिनशॉ स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक्स विभागात तज्ज्ञ असून रुग्णालयात स्पोर्ट्स मेडिसिनचे निर्देशकही आहेत. तसच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा उपचारही ते करत आहेत. ते ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचीही त्यांनी २०१९ मध्ये शस्त्रक्रिया केली आहे.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: जोकोव्हिच, अल्कराझची विजयी घोडदौड

अग्रमानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराझ व तिसरा मानांकित सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. ब्रिटनचा कॅमेरुन नॉरी, आंद्रे रुब्लेव्ह व नॉर्वेचा कॅस्पर रूड यांनीही आगेकूच केली. महिला गटात अरिना सबालेन्का, दारिया कसात्किना व कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला.जोकोव्हिचने दुसऱ्या फेरीतील सामन्यात हंगेरीच्या माटरेन फुक्सोव्हिक्सला ७-६ (७-२), ६-०, ६-३ असे नमवत तिसरी फेरी गाठली. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर अलेहांद्रो डेव्हिडोव्हिच फोकिनाचे आव्हान असेल.अल्कराझने जपानच्या टारो डॅनिएलवर ६-१, ३-६, ६-१, ६-२ असा विजय साकारला. पुढच्या फेरीत अल्कराझसमोर कॅनडाच्या डेनिस शापाव्हालोव्हचे आव्हान असेल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.