कोरोनामुळे साधारणत: दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांतील किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे.
राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर 15 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जाता येणार आहे. यासंदर्भातले निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
जून महिन्यातील विदर्भाचं तापमान विचारात घेता विदर्भात शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होवून 27 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
13 ते 14 जूनला शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादूर्भाव तसंच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसंच यापुढे देण्यात येणाऱ्या सूचनांचं काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसंच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे आणि पालकांचं कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन करावं असे निर्देशही सूरज मांढरे यांनी दिले आहेत.