मुक्ताईनगर तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू

कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अवघ्या सतरा दिवसात अंत झाला. पाच-पाच दिवसांच्या अंतराने येवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येवलेंच्या घराजवळील काही शेजारी कुटुंबांनी कोरोनाच्या धास्तीने थेट जंगलातच संसार थाटला आहे.

कोरोनाचा कहर काही केल्या थांबता थांबेनासा झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोना सदृश्य आजाराने एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा यात समावेश आहे. आधी आई-वडिलांवर काळाने घाला घातला, त्यानंतर धाकटा भाऊ गेला. तर अखेर मोठ्या भावाचाही जळगावच्या कोविड सेंटर गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला.

काकोडा गावातील अहिल्याबाई होळकर नगरातील रत्नमाला येवले यांचा दिनांक 17 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती रमेश येवले यांचीही प्राणज्योत मालवली. आई वडिलांची चितेची आग शांत होत नाही, तोवर दोन्ही मुलांचाही दुर्दैवी अंत झाला. आधी रवींद्र येवले आणि नंतर मोठा मुलगा चंद्रकांत येवले याचाही पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला

दोन्ही मुलांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहेत. एका भावाला दोन मुले आणि एक मुलगी, तर दुसऱ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी. घरची जबाबदारी आता या दोन्ही महिलांवर आली आहे. मात्र या कोरोनाचा काळात दोन्ही महिला आपापल्या माहेरी मुलाबाळांना घेऊन निघून गेल्या आहेत. एक मुलगा गाव खेड्यांमध्ये गोळ्या बिस्कीट विकत होता तर दुसरा मातकामाला जात होता. मेहनतीच्या बळावर यांनी कुटुंबाच्या विकासासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ही स्वप्नं त्यांच्या निधनाने विरुन गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.