जोहान्सबर्ग कसोटी रंगतदार वळणावर आहे. दुसऱ्यादिवस अखेर भारताच्या दोन बाद 85 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे (11) आणि चेतेश्वर पुजाराची (35) जोडी मैदानावर आहे. भारतासाठी हा कसोटी सामना कुठल्या दिशेने जाणार ते सर्वस्वी फलंदाजांवर अवलंबून आहे. भारताने दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल (23) आणि कर्णधार लोकेश राहुल (8) दोघांना गमावलं आहे. राहुल आठ धावांवर जॅनसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. मयंक अग्रवाल चांगल्या सुरुवातीनंतर (23) धावांवर बाद झाला. ओलिव्हरने त्याला पायचीत पकडलं.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्व पुजारा आणि अजिंक्य रहाणेने वेगाने धाव जमवल्या. पुजाराच्या फलंदाजीत आत्मविश्वास दिसत आहे. त्याने 42 चेंडूत 35 धावा केल्या. यात सात चौकार आहेत. दरम्यान आजचा दिवस गाजवला तो शार्दुल ठाकूरने. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. दक्षिण आफ्रिकेला फक्त 27 धावांची माफक आघाडी मिळाली. शार्दुलने कसोटी करीअरमध्ये पहिल्यांदाच 61 धावात सात विकेट घेतल्या.
मोठ्या भागीदाऱ्या होतील, अशी स्थिती असताना त्याने जोड्या फोडल्या. शार्दुलने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याची करामत करुन दाखवली आहे. या पाच विकेटसाठी त्याने फक्त 68 चेंडू टाकले. शार्दुलला पहिल्या 37 षटकापर्यंत कर्णधाराने गोलंदाजी दिली नव्हती. पण चेंडू हातात मिळाला, तेव्हा शार्दुलने दक्षिण आफ्रिकेची बोलती बंद केली. शार्दुलने पहिल्या पाच षटकात तीन विकेट घेतल्या. त्यानंतर टेंबा बावुमाची विकेट घेऊन पाच विकेट घेतल्या. या मैदानावर पाच विकेट घेणारा शार्दुल सहावा गोलंदाज आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, श्रीसंत, बुमराह आणि शमीने या मैदानावर पाच विकेट घेतल्या आहेत.