नाशिकमध्ये कोरोना रुग्णांनी अक्षरशः उसळी मारली असून, संख्या थेट 831 वर पोहचल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 844 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 39, बागलाण 15, चांदवड 05, देवळा 16, दिंडोरी 57, इगतपुरी 9, मालेगाव 5, नांदगाव 7, निफाड 51, सिन्नर 23, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 5, येवला 6 असे एकूण 240 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 548, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 33 रुग्ण असून, असे एकूण 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 14 हजार 433 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिकमधील पंचवटी येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयातील 27 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झालीय. त्यांच्या संपर्कातील 200 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेत. शिवाय वसतिगृहाचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी इगतपुरील्या मुंढेगाव आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी बाधित आढळले होते, तर चांदशी येथील खासगी शाळेत एक विद्यार्थी ओमिक्रॉन बाधित आढळला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही शर्यत पार पाडली. तोच कित्ता गिरवत दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा झाला. यावेळीही कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवण्याची भीती व्यक्त होत आहे.