‘…हे खपवून घेतलं जाणार नाही’, नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना इशारा

सत्यजीत तांबेंच्या बंडावरून आक्रमक झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून राजीनामा पाठवला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेला काँग्रेसमधल्या काही नेत्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही बाळासाहेब थोरात यांची बाजू घेत नाना पटोले यांना सबुरीचा सल्ला दिला.

काँग्रेसमधल्या या वादावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. मी मांडलेली भूमिकाच सुनिल केदार यांनी मांडली आहे. बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत, हेच आम्ही सांगतो. 10 तारखेच्या बैठकीत चर्चा होईल, असं नाना पटोले म्हणाले.

’15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या सगळ्या गोष्टीचे हिशोब तिथेच दिला जाईल. अखिल भारतीय काँग्रेसकडून अनेक कार्यक्रम दिलेले आहेत, त्याचा आढावा या बैठकीत घेणार आहोत. तसंच दोन नवनियुक्त आमदारांचा सत्कार होईल. आगामी निवडणुका जिंकण्याची रणनीती बैठकीत ठरवू,’ असं नाना पटोले यांनी सांगितलं.

‘कुणाच्या इशाऱ्याने पक्षात कुणाला काम करायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे पक्षाच्या मंचावर त्यांनी आपले प्रश्न मांडावे. राज्याचा प्रमुख म्हणून समर्थपणे उत्तर देण्यासाठी तयार आहे. बाहेर बोलणाऱ्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं 15 तारखेच्या बैठकीमध्ये देऊ. आपसात बसून तोडगा काढू, पण जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते पक्ष खपवून घेणार नाही,’ असा इशाराच नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.