आज दि.१४ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये
भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप

अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करणाऱ्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय आणि अंलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.

अवघ्या २९ दिवसात उभारले
शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटल

शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा उपयोग खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अवघ्या २९ दिवसात प्रशासन व सर्वांच्या मदतीने हे उभे राहिले आहे. यामध्ये २४० ऑक्सिजन व ४८ व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २४ कोटी २४ लाख रूपये शासनाने मंजूर केले असले तरी यातील बहुतांश रक्कम पुढील एक वर्षातील वैद्यकीय उपचारासाठी वापरली जाणार आहे. अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडला.

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी
गहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारले

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे ग्रह जागेवर नाहीत. अश्यात मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आहे तो दमही निघून जातोय. आता राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी गहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे. आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात आणि काँग्रेस कार्यकारीणीत स्थान दिले नाही, तर आमचा मार्ग मोकळा आहे, असा थेट इशाराच पायलट यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमानची अस्वस्थता वाढलेली आहे. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तसेही वातावरण तापलेले आहे.

कागदाच्या सहाय्याने कोरोना विषाणूच्या
म्युटेशनचा शोध लावण्याचे तंत्र

जिनोम सिक्वेन्सिंग विज्ञानात भारतीय वैज्ञानिकांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. वैज्ञानिकांनी प्रथमच कागदाच्या सहाय्याने एका तासाच्या आत कोरोना विषाणूच्या म्युटेशनचा शोध लावण्याच्या तंत्राला विकसित केले आहे. त्याला फेलुदा रे (आरएवाय) असे नाव देण्यात आले आहे. गेल्यावर्षी चाचणीसाठी फेलुदा नावाची चाचणी किट तयार करण्यात आली होती. त्या किटचा आता अनेक राज्यांमध्ये वापर केला जात आहे.

धर्मपरिवर्तन करून लग्न करणाऱ्या
जोडप्यांना संरक्षण देणे महत्त्वाचे

धर्मपरिवर्तन करून लग्न करणाऱ्या १८ वर्षांवरील जोडप्यांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यांचे मत परिवर्तन झाल्याने संरक्षण देण्यास टाळाटाळ करणे अयोग्य असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. जबरदस्तीने मतांतरण करण्याचा आरोप नसल्यास पोलिस आणि प्रशासनाने संबंधितांना संरक्षण पुरविणे अनिवार्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. १८ वर्षांवरील तरुण-तरुणीने आपल्या मनाप्रमाणे लग्न केले असेल अथवा मनाविरुद्ध केले असेल तरीही त्यांना सोबत राहण्याचा अधिकार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
नाना पटोले यांना फटकारलं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असंही सूतोवाच नाना पटोले यांनी केलं आहे. मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. परंतु पटोले यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल, असे भाकीत व्यक्त करीत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना फटकारलं आहे.

कोल्हापूर मध्ये निर्बंध कमी
केले जाणार नाही : अजित पवार

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा – संसर्ग कायम आहे. त्यामुळेच कोल्हापूर हे चौथ्या श्रेणीत आहे. परिणामी, येथील निर्बंध कमी केले जाणार नाहीत. उलच निर्बंध वाढविण्याचा विचार केला जाईल, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोना आढावा बैठकीसाठी ते आले होते. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट राज्यभरात ओसरत असताना कोल्हापूरमध्ये मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. जेथे संसर्ग आहे तेथे निर्बंध कायम ठेवले जातील.

बाधित शेतकऱ्यांना जमिनीच्या
मोबदल्यात पाच पट मोबदला देवू

नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शासन बाधित शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करेल असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाला दिले.

बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये
चीन मोठी गुंतवणुक करण्याच्या तयारीत

पाकिस्तानची अवस्था कुत्र्यासारखी केल्यानंतर चीनने श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या भारताच्या शेजाऱ्यांवर आपला प्रभाव वाढविण्याचे काम सुरू केले आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये चीन मोठी गुंतवणुक करण्याच्या तयारीत आहे. केवळ एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर या तिन्ही देशांना राजकीय समर्थ देऊन तेथे जम बसविण्याची पूर्ण तयारी सुरू झाली आहे. या देशांमधील बंदरांवर चीनला नियंत्रण हवे आहे. म्हणजे हिंद महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यातील मार्गांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे चीनला वाटत आहे.

लोकजनशक्ती पार्टीच्या पाच खासदारांनी
घेतला वेगळे होण्याचा निर्णय

वडील रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान हे आणखी अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर चिराग यांना आता पक्षांतर्गत मोठ्या धक्क्याला तोंड द्यावे लागत आहे. लोकजनशक्ती पार्टीच्या (एलजेपी) पाच खासदारांनी पार्टी प्रमुख खासदार चिराग पासवान यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एलपीजीमध्ये ही सर्वात मोठी फूट असल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये गेलेले नेते, कार्यकर्ते
तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले

राजकीय रणसंग्रामात ममता बॅनर्जी यांनी भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर त्याचे पडसाद अनेक दिवस उमटत राहिले. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हल्ले केल्याचे आरोप करण्यात आले. परंतु आता वे सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले नेते, कार्यकर्ते पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनधरणी केली जात आहे. काही भाजपचे कार्यकर्ते तर चक्क गावांमध्ये फिरून भाजपमध्ये गेल्याची चूक केल्याचे मान्य करत ध्वनिक्षेपकावरून जनतेची जाहीर माफी मागत आहेत.

दहावी, बारावीचा निकाल गुणवत्ता
यादी शिवाय जाहीर केला जाणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने इयत्ता १०वी व १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनेही असेच जाहिर केले आहे. मात्र, निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल गुणवत्ता यादी शिवाय जाहीर केला जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकार शालेय शिक्षणासह अन्य कामांवरही सतत नजर ठेवून आहे.

शाळा सुरू करण्याबाबत
संभ्रमाची अवस्था

राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय.

मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं
कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकार, खेळाडूंनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी देखील आपल्या सर्वात जवळची व्यक्ती कोरोनामुळे गमवली आहे. मिल्खा सिंग यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पत्नीनं त्यांच्या साथ सोडली असून कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.

नोव्हाक जोकोव्हिचनं १९व्या
ग्रँडस्लॅम पदावर नाव कोरलं

फ्रेंच ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्याचा निकाल नुकताच लागला आहे. युवा आणि झुंजार त्सित्सिपासला पराभूत करत नोव्हाक जोकोव्हिचनं इतिहार रचला आहे. राफेल नदालला सेमिफायनलमध्ये पराभूत करून फायनलमध्ये देखील जोकोव्हिचनंच बाजी मारली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं आणि १९वं ग्रँडस्लॅम पदावर आपलं नाव कोरलं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.