आज दि.३० जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पूरग्रस्त भागांत वीजवसुली
न करण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय पुरुष संघाने केले
जपानला पराभूत

बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने देशासाठी दुसरे पदक निश्चित केले तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. दरम्यान, हॉकी टर्फकडून भारतासाठी एक चांगली बातमी आली, जिथे पहिल्या महिला संघाने आयर्लंडचा पराभव करून पहिला विजय नोंदवला आणि आशा जिवंत ठेवल्या. त्याचवेळी, भारतीय पुरुष संघाने जपानला त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात ५-३ ने पराभूत आणि गट टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसरे स्थान कायम राखले.

मी मदत करणारा मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे

कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर बोलताना “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं.

कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले

भाजपा प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी आज राज कुंद्रावर पत्रकारपरिषदेत बोलताना गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. राम कदम म्हणाले की, राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप केला आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची
उपांत्य फेरीत धडक

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० अशा सेटमध्ये नमवले.

सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर,
७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्के

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५० हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७० हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २०२० मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल
कृष्णप्पा गौथम यांना करोना

श्रीलंका दौऱ्यावर असेलेले भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना करोनाची लागण झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला करोना झाला आहे. त्यानंतर कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळांडूना क्वारंटाइन करण्यात आले होते. शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडियाने श्रीलंका दौर्‍यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या.

दिल्लीत येण्याची इच्छा नव्हती,
जबरदस्तीने आलो : गडकरी

दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती. अपघाताने आणि जबरदस्तीने दिल्लीत आलो असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. दिल्लीत कार्यक्रमात नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते.

सातारा शहरात ११ तलवारींसह
इतर हत्यारे जप्त

सातारा शहरात मध्यवस्तीत जिल्हा विशेष शाखेने कारवाई करून, सुमारे ११ तलवारींसह इतर हत्यारे जप्त केली. सातारा येथे मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे.

शूटऑफमध्ये तिरंदाज
दीपिका कुमारीचा विजय

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर मेरी कोमला राऊंड ऑफ 32 मध्ये पराभव पत्करावा लागला. शूटऑफमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीचा विजय मिळवला आहे.

कनिष्ठ न्यायालयांमध्ये
न्यायाधीशांच्या 5132 जागा रिक्त

केंद्र सरकारने लोकसभेत देशातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या रिक्त पदांबाबत माहिती दिली. कायदामंत्री किरण रिजिजू यांनी ही माहिती सादर केली. सरकारने लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या सर्वोच्च न्यायालयात 8 न्यायमूर्तींच्या जागा रिकाम्या आहेत. पुढच्या 2 महिन्यांत आणखी 2 न्यायमूर्ती सेवानिवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात 29 टक्के न्यायमूर्तींच्या जागा रिकाम्या होतील. न्यायमूर्तींची शेवटची नियुक्ती 2019 मध्ये करण्यात आली होती. 10 जणांची नियुक्ती करण्यात आली होती.

राज्यातील 25 जिल्ह्यातील
निर्बंधामध्ये शिथिलता

राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राजेश टोपे यांनी ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.