अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. महापुरानं अनेक संसार उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर शेतीची वाताहत झाली. महापुरामुळे राज्यात तब्बल 6 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचं नुकसान झालं.
आता पूर ओसरला असला तरी पूरपरिस्थितीनंतरचं विदारक आणि धक्कादायक दृश्य समोर येत आहे. रायगडमधल्या महाडमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला. यात बँकाही सुटल्या नाहीत. बँकांच्या लॉकरमध्ये पाणी गेल्यामुळे कोट्यवधींच्या नोटांचा चिखल झालाय. आता कर्मचारीवर्ग या नोटा वाळवण्यात गुंतल्या आहेत. कुणी नोटांना इस्त्री मारतंय. तर कुणी पंख्याखाली नोटांची बंडलं ठेवून वाळवतंय..
पुरामुळे कोट्यवधी रूपयांच्या चलनी नोटा भिजल्या आहेत. शिवाय एटीएममध्ये पाणी शिरल्यानं अनेक मशीन्सही बंद पडल्या आहेत. आता या नोटा वाळवणं आणि लोकांच्या ठेवींचा चोख हिशेब ठेवणं हे मोठं आव्हान बँकांसमोर असणार आहे. नोटांप्रमाणे ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले दागिने तसंच सेफ डिपॉझिट लॉकरमध्येही चिखलगाळ साचलाय.
महापुरानं आधीच इथले सर्व व्यवहार ठप्प झालेत. त्यात नोटांचाही चिखल झाल्यानं चलनी नोटांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. महापुरानं महाड शहराची अर्थव्यवस्थाच ठप्प झालीय. जोपर्यंत वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत बँकांचे व्यवहार सुरळीत होणं अशक्य आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत तरी इथल्या लोकांना, आहे त्या रकमेवरच दिवस काढावे लागणार आहेत. (फोटो क्रेडिट गुगल)