कोल्हापूरच्या राजकारणात आता महाभारत होताना दिसणार आहे. कारण भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबतचं सूचक विधान केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना खुला इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापुरच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं. या काळात कोल्हापुरात सतेज पाटील यांनी चांगलं वर्चस्व मिळवलं होतं. सतेज पाटलांनी कोल्हापुरात गोकुळ दूध संघ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींपासून ते विधानसभा-खासदारकीच्या निवडणुकीत महाडिकांचा पराभव केला. पण दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला आणि त्यांना राजकारणात नवसंजीवनी मिळाली. या विजयाने महाडिकांचा उत्साह वाढला आहे. विजयानंतर महाडिकांच्या समर्थकांनी कोल्हापुरात प्रचंड जल्लोष केला होता. महाडिकांसाठी तो क्षण अतिशय भावनिक असा क्षण होता.
गेल्या अडीच वर्षात धनंजय महाडिकांना अनेक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. पण आता महाडिकांच्या घरात खासदारकी आल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाची आता राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे महाडिकांना आपण पुढच्या निवडणुकांमध्ये जिंकूनच येवू, असा विश्वास आहे. याच विश्वासातून त्यांनी सतेज पाटलांना इशारा दिला आहे.
धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
इथून पुढे महाभारत होणार, वाईटाचा नाश होणार, असा इशारा धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना दिला. “आमचं ठरलंय म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला. गेल्या अडीच वर्षात प्रचंड त्रास दिला. आमच्यावर केसेस टाकल्या. अभिमन्यूला घेरल्यासारखं मला घेरलं होतं. पण मी बोललो होतो. सत्ता आमच्याकडे आली तर तुम्हाला झेपणार नाही. इथून पुढे महाभारत होणार. वाईटाचा नाश होणार आहे”, असा इशारा महाडिकांनी दिला.