भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा दोन गडी राखून पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाय होपच्या शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकांत सहा गडी गमावून ३११ धावा केल्या. हे लक्ष्य पार करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली होती. शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ४८ धावा जोडल्या. पण, त्यानंतर ७९ धावांपर्यंत पोहोचण्याआधीच भारताने आपले तीन गडी गमावले.
त्यानंतर श्रेयस अय्यर (६३) आणि संजू सॅमसन (५४) यांच्यातील ९९ धावांच्या भागीदारीने सामना भारताच्या बाजूने वळवला. दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या. ते दोघे बाद झाल्यानंतर भारत पराभवाच्या छायेत आला होता. मात्र, दीपक हुडा आणि अक्षर पटेलने लक्ष्याचा पाठलाग सुरू ठेवला. अक्षर पटेलने जबरदस्त निर्णायक खेळी करून सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला.
भारताला विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये ८ धावांची आवश्यकता होती. पटेलने शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला. या दरम्यान त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३५ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. कायले मेयर्स आणि शाय होप यांनी पहिल्या गड्यासाठी ५५ चेंडूत ६५ धावांची भागीदारी केली.
मेयर्स २३ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर, ब्रुक्स आणि होप यांनी दुसऱ्या गड्यासाठी ७४ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. ब्रुक्स ३५ धावा करून बाद झाला. ब्रँडन किंग शून्यावर बाद झाला. शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी केली. पूरन ७७ चेंडूत ७४ धावांची धडाकेबाज खेळी करून बाद झाला. या दरम्यान, शाय होपने आपले शतक पूर्ण केले. त्याने १३५ चेंडूत ११५ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन, दीपक हुडा, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहलने प्रत्येक एक-एक बळी घेतला