शिवसेना कोणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता निवडणूक आयोगात गेल्याने पक्षसंघटना टिकवण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे दौऱ्यावर निघाले तर मुंबईत उद्धव ठाकरे यांनी बैठक सत्र सुरूच ठेवले आहे. शिंदे गटात दाखल झालेले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी झाली तर नाशिकमधील शिवसैनिकांची मातोश्रीवर बैठक घेत ठाकरे यांनी आगामी काळात काय करायचे यावर चर्चा केली. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षसंघटना टिकवण्यासाठी ठाकरे यांनी सुरू केलेले बैठक सत्र सुरूच आहे. नाशिक हा शिवसेनेची ताकद असलेला जिल्हा. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या जाण्याने नाशिक ग्रामीण व मालेगाव परिसरात तर खासदार हेमंत गोडसे यांच्या जाण्याने शहरात पुढील काळात कशा रीतीने वाटचाल करायची, आगामी निवडणुकीत काय भूमिका करायची याबाबत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिवसैनिकांसह चर्चा केली. ‘‘कितीही आमदार, खासदार फुटू देत, आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार’’, असे माजी नगरसेवक राजाराम जाधव यांनी जाहीर केले. तर या बैठकीत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे शपथपत्रही भरून घेण्यात आले. त्याचबरोबर शिंदे गटात गेलेले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदावरून दूर करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रतापराव जाधव यांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.