शिवसेनेविरोधात बंडखोरी करुन भाजपसोबत हात मिळवणी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट मनसेत विलीन होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ‘झी 24 तास’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटाकडून तशी ऑफर आली तर आपण नक्कीच विचार करु, असं विधान केलं. त्यामुळे शिंदे गटाला मनसेकडून खुली ऑफर आल्याची चर्चा होती. पण मनसेच्या या ऑफरवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले भाऊ राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका करत त्यांची पुन्हा खिल्ली उडवली.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन गेल्या सरकारला जेव्हा अल्टिमेटम दिला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज यांना ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमातील मुन्नाभाईची उपमा दिली होती. तसेच राज यांच्यात मुन्नाभाई सारखा केमिकल लोच्चा झाल्याची खोचक टीका केली होती. आता पुन्हा त्यांनी पुन्हा तशीच काहिशी टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईच्या काळाचौकी येथील शिवसेना शाखेचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“56 वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन केली तेव्हा हाच तो परिसर आहे. या मनगटात ताकद ज्या शिवसेनेने दिली ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांचे जे करता करविते आहेत, महाशक्ती, म्हणजे कळसुत्री बाहुल्यांचे संचालक. त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा भगवा झेंडा उतरवायचा आहे आणि आपला ठसा उमटवायचा आहे. आजपर्यंत संकटं अनेक आली, पण ज्यावेळेला संकटं आली त्या त्या वेळेला संकटांना गाळून शिवसेना जोमाने उभी राहिलेली आहे. अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आता जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घ्या. कारण जे सगळे कायदेतज्ज्ञ सांगत आहेत. हे जे फुटलेले आहेत त्यांना कुठल्याना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. आणि कुठल्या पक्षात जाणार आहेत? त्यांना काल एका पक्षाने ऑफर दिली आहे. किती जणांचा केमिकल लोच्चा झाला असेल सांगता येत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेत राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.
‘तुम्ही दरोडेखोर, माझा बाप चोरायला निघाले’
“त्यांना एकतर शिवसेना संपवायची आहे. जोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना आहे तोपर्यंत हे नातं राहणार. तुमच्या कितीही पिढ्या तळपाताळातून आल्या तरी त्यांना गाडून हे नातं टिकणार. म्हणून त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नातं तोडायचं आहे. नातं जर तोडायचं असेल तर हे जे स्वत:ला मर्द समजत आहेत, बंडखोर ही बंडखोरी नाही हरामेगिरी, नमखहरामीपणा आहे. तुमच्यात एवढी मर्दांगी असेल तर माझ्या वडिलांचा शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा. प्रत्येकाला आई-वडिल जीवापेक्षा प्यारे असतात. कारण आपण सुसंस्कृत माणसं आहोत. जे फुटून गेले आहेत, सुदैवाने ज्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत आहेत, त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना घेवून सभा घ्याव्यात आणि मते मागावीत. तुम्हाला पक्षही चोरायचा आहे, पण तुम्ही वडील चोरायला निघालेत? कसले मर्द तुम्ही, तुम्ही दरोडेखोर आहात. अशा लोकामंकडे तुम्ही महाराष्ट्र, मुंबई देणार आहात का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना विचारला.
‘…तरी भाजपच्या दगडाला अडीच वर्षांसाठी सिंधूर लागला असता ना’
“शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत. अजय चौधरी यांना विधीमंडळ गटनेता केलं आहे. 2019 साली आपले जेव्हा करार ठरले होते. त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी आपल्याला जे मंत्रिपद नको होतं ते मिळालं. त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरल्याप्रमाणे केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. मनावर दगड ठेवून आज जे करायला लागलं आहे, आज कोणत्या तरी भाजपच्या दगडाला अडीच वर्षांसाठी सिंधूर लागला असता ना. आज तुमच्या मनावर एवढा दगड पडलेला आहे, मग तेव्हा का नाही सांगितलं की हे आमचं ठरलेलं होतं. काय-काय नाटकं केली? आधी जागा वाटप 50-50 टक्के ठरलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. एकतर आपल्याला जागा कमी दिल्या. ज्या जागा दिल्या तिथे बंडखोरी केली. त्या जागा पाडल्या. नंतर शब्द मोडला. शिवसेनेचा मुख्यमंत्री संभवच नाही. जे संभव नव्हतं ते संभमावी युगेयुगे कसं झालं? आता सामान्यातून पुन्हा असामान्य लोकं घडवायची आहेत. शिवसैनिकांची ताकद असामान्य आहे. त्यांना कळलेलं नाही. कोणत्या शक्तीशी पंगा घेतलेला आहे. ही स्वाभिमानाची ताकद आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.