भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण होवूनही देशातील काही ठिकाणी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे उभी राहिलेली नाही. याचं ताज उदाहरण यवतमाळ जिल्ह्यात बघायला मिळालं आहे. यवतमाळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेवून जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध न होवू शकल्याने धक्कादायक घटना घडली.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. यात महिलेच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून आरोग्य विभगाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
टाकळी येथील शुभांगी सुदर्शन हाफसे ही महिला प्रसूतीसाठी आपल्या माहेरी विडुल येथे आली होती. तिला आज दुपारच्या सुमारास प्रसूती वेदना होत असताना 108 रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी महिलेच्या वडिलांनी ऑटो करून तिला रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी रुग्णालय कोणीही डॉक्टर नव्हते. मुख्य प्रवेशद्वारावर असतानाच अवघ्या काही वेळातच शुभांगीच्या वेदना वाढल्या आणि तिची प्रसूती झाली. यात बाळचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली.