‘दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली’, मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

मुंबईमध्ये यंदा दहीहंडीचा उत्साह मोठ्याप्रमाणावर दिसत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असल्यामुळे राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मुंबई, ठाणे आणि कल्याण भागांमधल्या वेगवेगळ्या दही हंडींच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

भाजप नेते प्रविण दरेकर यांच्या दहीहंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. यंदाची दहीहंडी ही ख-या अर्थाने हिंदुत्वांची हंडी आहे. गोविंदा हे आपली परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचे काम करीत असतात. आज गोविंदांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह जाणवत आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर निर्बंध होते, पण उपमुख्यमंत्री व आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘तुम्ही दहीहंडी मधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली, त्यामुळे आज या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया. आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया. राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं.

भाजपा मागाठाणे विधानसभा आणि शिवराज प्रतिष्ठान आयोजित दहिसर, अशोकवन येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.