राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्याच्या बिझनेस पार्टनर यांची नावे समोर आल्यानंतर, आता तिची आई सुनंदा शेट्टी यांनी फसवणूकीच्या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. जुहू पोलीस स्टेशनमध्ये सुनंदा शेट्टी यांनी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात फिर्याद दिली आहे. सुनंदा यांचे नाव राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात देखील जोडले गेले आहेत. चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, त्या सप्टेंबर 2020 पर्यंत कुंद्राच्या एका कंपनीत संचालक म्हणूनही कार्यरत होत्या.
मालमत्ता फसवणूकीशी संबंधित हे प्रकरण रायगडमधील एका जमिनीशी संबंधित आहे. प्राप्त माहितीनुसार सुनंदा शेट्टी यांनी सन 2019मध्ये रायगडच्या कर्जत येथे जमीन व बंगला खरेदी केला होता. ही जमीन त्यांनी सुधाकर नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतली होती. मात्र, ही जमीन आणि बंगला कधीही सुधाकरचा नसल्याचे तपासात उघड झाले आहे. जेव्हा, सुनंदाने सुधाकर यांना पैसे परत करण्यास सांगितले, तेव्हा त्याने ते परत देण्यास नकार दिला. यानंतर सुनंदाने कोर्टात धाव घेतली होती. आता या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर फसवणूकीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दुसरीकडे, राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने नवीन पुरावे मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टी हिला क्लीन चिट देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात सुनंदा शेट्टीचा थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा सध्या तरी मिळालेला नाही, पण अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा सुरेंद्र शेट्टी या देखील सप्टेंबर 2020पर्यंत राज कुंद्राच्या कंपनीत संचालक पदावर होत्या, असे तपासात समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राची कंपनी जेएल स्ट्रीमची जाहिरात करत होती. ही तीच कंपनी आहे, जिच्यावर अश्लील सामग्री तयार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट गुगल)