वन्य प्रेमी बरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब म्हणजे आणखी दोन वाघांचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक वाघ आणि वाघिणीचा समावेश आहे. नागपूर क्षेत्रातील पेंच अभयारण्यामध्ये हे मृतदेह आढळले आहेत. गेल्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल १३ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी वनक्षेत्रालगतच्या परिसराला जोडणाऱ्या वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात वाघाचा मृत्यू उघडकीस आला. पूर्ण वाढ झालेल्या या वाघाचे चारही पंजे कापलेले असून सात-आठ दिवसांपूर्वी हा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र . ७०७ मधील रिसाळा वनक्षेत्रातील वारापाणी बीटचे वनरक्षक श्रिंगारपुतळे यांना मंगळवारी सारा गावाजवळील छोट्या नाल्यात या वाघाचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी ही शिकार असल्याचा अंदाज आहे.
दुसऱ्या घटनेत वणी तालुक्यातील घोन्सा गावाजवळ एका वाघिणीचा गळ्यात तारांचा फास अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. वाघिणीचे वय अंदाजे सहा वर्षे होते. मारेगाव वनपरिक्षेत्रात वाढोणा बीटमध्ये नाल्यात ही वाघीण मृतावस्थेत आढळली. मारेगाव वनपरिक्षेत्रासह पांढरकवडा वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. शेतातील संरक्षक तारेत अडकून जखमी झाल्याने या वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र, शिकारीसाठी हा फास लावला नव्हता ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.