तरुण वयामध्ये प्रतिकारशक्ती अधिक असते असे आतापर्यंत आपण समजत होतो मात्र या समजुतीला छेद दिला गेला आहे. तरुण वर्गामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याची बाब समोर आलेली आहे. राज्यातील तरुणांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर तरुणांनी सावधगिरी बाळगणे अतिशय महत्त्वाचे आहे.
राज्यात आणि देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे आणि ती घातक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेषता तरुण वर्ग देखील या लाटे पासून वाचलेला नाही. राज्यात ३० ते ४० वर्ष वयोगटातील रुग्ण सर्वाधिक, म्हणजे २१ टक्के एवढे आहेत. त्यामुळे दुसरी लाट सुरू झाल्यानंतर तरुण वर्गाने सर्वाधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वात कमी म्हणजे १.६९ टक्के रुग्ण ८० वर्षांवरील वयोगटातील आहेत. १० वर्षांखालील मुलांना संसर्गाचे प्रमाण ३.४४ टक्के एवढे आहे. ११ ते २० वर्ष वयोगटात हे प्रमाण काहीसे वाढले असून ६.६७ टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. ७१ ते ८० वर्ष वयोगटातील ५.२९ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.
सर्वाधिक रुग्णसंख्या २१ ते ७० वर्ष या दरम्यान आढळली आहे. २१ ते ३० वर्षांदरम्यान १६.३३ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाला. सर्वाधिक रुग्णसंख्येचा वयोगट ३१ ते ४० वर्ष आहे. ४१ ते ५० वर्ष वयोगटात १८ टक्के रुग्ण आहेत. ५१ ते ६० वर्ष वयाचे १६.२३ टक्के रुग्णांना करोना संसर्ग झाला. ६१ ते ७० वर्ष वयाचे ११ टक्के रुग्ण कोरोना बाधित झाले.