निसर्गाचा लहरीपणा, घटलेले क्षेत्र यामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट ही अपेक्षितच होती. त्याप्रमाणे सरासरीपेक्षा 5 लाख गाठींनी उत्पादन घटले असल्याचा दावा भारतीय कापूस उत्पादक संघाने केला आहे. सप्टेंबर अखेरीस (Cotton) कापसाची काढणी सुरु होती. यंदा दरम्यान, 343.13 लाख गांठींचे उत्पादन झाले असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर गतवर्षी कापसाचे एकूण उत्पादन हे 353 दशलक्ष गाठींचे होते.
उत्पादन घटण्यामागे तेलंगणातील उत्पादनाचा सर्वाधिक परिणाम आहे. या राज्यात सर्वाधिक उत्पादन होते मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झालेली आहे. सप्टेंबर-ऑक्टोंबरच्या दरम्यान, कापसाचा हंगाम सुरु होतो. गेल्या हंगामात 353 दशलक्ष गाठींचे उत्पादन होते. एवढेच नाही तर गतवर्षी देशांतर्गत कापसाचा वापरही वाढला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सर्वच समीकरणे ही बदलेली आहेत.
भारत कापूस उत्पादक संघाच्या, ताज्या अंदाजानुसार गतवर्षीच्या तुलनेत 5 लाख गाठींची कपात ही झाली आहे. या हंगामात तेलंगणात प्रत्येकी 2 लाख गाठी, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी एक लाख गाठी आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये 50 हजार गाठींचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 या चार महिन्यांत कापसाचा एकूण पुरवठा 272.20 लाख गाठींचा झाल्याचा अंदाज ‘सीएआय’ने व्यक्त केला आहे. यामध्ये हंगामाच्या सुरुवातीला 192.20 लाख गाठींची आवक, 5 लाख गाठींची आयात आणि 75 लाख गाठींचा प्रारंभिक साठा यांचा समावेश आहे. तसेच, ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत अंदाजे कापसाचा वापर 114 लाख गाठींचा होण्याचा अंदाज आहे, तर 31 जानेवारी 2022 पर्यंत 25 लाख गाठींची निर्यात करण्यात आली आहे. सीएआयने अंदाजे घरगुती वापर 3.45 लाख गाठींच्या मागील अंदाजाच्या तुलनेत 3.40 लाख गाठींपर्यंत कमी केला आहे.
सध्या कापसाचे दर वाढतच आहेत. वर्षाच्या सुरुवातीला कापसाचे दर 80 टक्क्यांनी वाढले होते. गेल्याच महिन्यात उद्योग संघटनेने कापसाच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवणे, कापूस आयातीवरील 10 टक्के शुल्क काढून टाकणे आणि कापूस व अन्य कच्च्या मालाचे दर नियंत्रित करण्यासाठीची मागणी केली होती. कापसाच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने गारमेंट उत्पादक आणि निर्यातदारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, त्यांची ऑर्डर मिळत नाहीत असे चित्र आहे. अशा परिस्थितीत यंदाही कापसाचे उत्पादन घटले तर निर्यातदारांची अडचण वाढणार आहे.