‘तीन महिन्यांपूर्वी आम्हीही बॅटिंग केली, काहींचा अप्रत्यक्ष आशिर्वाद,’ पवारांसमोर काय बोलले एकनाथ शिंदे?

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुका गुरूवार 20 ऑक्टोबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल रिंगणात उतरलं आहे. या निवडणुकीआधी पवार-शेलार पॅनलकडून डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात  शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक हे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली.

‘थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते. संधी मिळाली की बॅटिंग करतो. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सगळ्यांच्याच आशिर्वादाने ती मॅच जिंकली. काहींचे उघडपणे आशिर्वाद होते, काहींचे आतून होते, मनापासून होते, मी काही नाव घेत नाही,’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हास्य केलं.

पवार साहेबांचंही नेहमी मार्गदर्शन असतं, चांगल्या कामाला त्यांचा आशिर्वाद असतो,’ असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. अंधेरीमध्ये पवार साहेबांनी राजकारणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सांगितलं, तो त्यांचा हक्क आहे. पवार साहेबांचा जन्म आणि माझा जन्म साताऱ्याचा जे पवार साहेबांनी सांगितलं ते आम्ही करणार, खेळात राजकारण आणायचं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

अमोल काळे-संदीप पाटील लढत

दरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात रंगणार आहे. आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार-शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याआधी संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही मोठा ड्रामा रंगला होता. संदीप पाटलांनी अर्ज दाखल करताना आपण पवार गटाकडून अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पवार आणि शेलारांची युती झाली. त्यावेळी शेलारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला. त्यानंतर संदीप पाटलांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता अध्यक्षपदी पाटलांची वर्णी लागणार की पवार-शेलार गटाचा उमेदवार सिक्सर मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.