तुळजापूरची तुळजाभवानी अखिल महाराष्ट्राचे कुलस्वामिनी. साक्षात पार्वतीचे रूप आहे असे मानले जाते. तुळजापूर अत्यंत जागृत स्थान आहे. नवरात्रात इथे भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. इथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तुळजाभवानीच्या मंदिरासाठी प्रवेशिका अनिवार्य आहे.
देवीचे मोहक रूप
देवीचे मंदिर सभामंडपा पासून बरेच लांब आणि खोल आहे. मंदिराचे बांधकाम अत्यंत प्राचीन असून दगडी आहे. खूप पायऱ्या उतरून गेल्यावर देवीचा गाभारा दृष्टीस पडतो. देवीच्या दर्शनाआधी विघ्नहर्त्या श्री गणेशाचे दर्शन होते . सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे .हेमाडपंथी मंदिर आणि त्याचे आवार प्रशस्त आणि मोठ्ठा आहे. मंदिराचे सभामंडपात सोळा खांब आहेत. गणरायाच्या दर्शनानंतर खाली उतरले की देवी मंदिराचे मुख्य आवार दृष्टीस पडते. संपूर्ण भारतातून भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.. नवरात्रात भाविकांच्या भक्तीला उधाण आले असते. या सोहळ्यात देवीच्या जवळ असलेल्या दिव्याची ज्योत पेटवून घरी नेतात. चांदिच्या सिंहासनावर आरुढ भवानी मातेची काळ्या पाषाणाची मुर्ती गाभार्याच्या मधोमध स्थापित आहे. मूर्ती दगडी असली तरी अतिशय रेखीव आणि तेजपुंज आहे. तिला आठ भुजा आहेत. त्रिशूल,बिछुवा, बाण, शंख ,चक्र अशी आयुध आणि राक्षसाची शेंडी तिच्या हातात आहेत. शृंगारामुळे हातातील आयुध मात्र नजरेस पडत नाही. देवीच्या एका हातात महिषासुराची शेंडी, दुसऱ्या हाताने तिने त्याच्या बरगडीत त्रिशूल खुपसलेला आहे , उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मार्कडेयांची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि डाव्या खांद्याजवळ सूर्य प्रतिमा स्वरूपात आहे.
देवीला रोज दही दुधाचा अभिषेक
देवीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. तिला पूजाऱ्या व्यतिरिक्त कोणीही स्पर्श करू शकत नाही, देवीच्या स्नानासाठी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ इथल्या ठिकाणचे तिर्थ एकत्र आणले . त्याला कल्लोळ तीर्थ असे म्हणतात .श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करताना मंदिरात उजव्या बाजूला गोमुखतीर्थ आहे. त्यास प्रति काशी असेही म्हणतात .या तिर्थाने देवीला रोज स्नान घातले जाते. देवीच्या दर्शनापूर्वी भाविकही गोमुखातून येणाऱ्या जलाने स्थान करतात. दोन गाईंचे मुख असल्याने त्याला गोमुख तीर्थ असे म्हणतात. या मुखातून सतत जलस्रोत वाहत असतो. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार असेही म्हणतात. मंदिर परिसर अतिशय प्रशस्त आणि मोठा आहे .नवरात्रात दरवर्षी यज्ञमंडपात शतचंडी यज्ञ होतो. हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम सुबक आहे. कोरीव शिल्प काम असलेला कळस नजरेत भरणारा आहे. अष्टभुजा, महिषासुरमर्दिनी च्या मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभून दिसतो. मुकुटा खालून तिच्या केसांच्या बटा बाहेर आलेल्या असतात. देवीला रोज दही दुधाचा अभिषेक असतो.
छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान
मंदिराच्या मागच्या बाजूला एक भुयार आहे. या भुयारातून शिवरायांनी मंदिरात प्रवेश केला होता. मंदिराच्या बाजूच्या मंडपात छत्रपती दरवाजा आहे. दरवाज्यातून आत जात असताना प्रत्यक्ष तुळजाभवानी शिवरायांना भवानी तलवार देत असल्याचे जिवंत चित्र नजरेस पडते. मंदिराच्या मागच्या बाजूला काशी कुंड आहे, दर सोमवती अमावस्येच्या रात्री बारा वाजता काशीहून गंगा या ठिकाण महादेवाच्या पिंडी पर्यंत येते. महादेवाचे स्थान झाल्यावर हे पाणी ओसरते. हे पाणी उकळतं असतं असे इथले स्थानिक लोक सांगतात. देवी मंदिराच्या मागच्या बाजूला थोडे दूर भारती बुवांचा मठ आहे. तिथे देवीची सारीपाठ खेळण्याची जागा होती असे दिसते. असे म्हणतात की ,आपल्या तपश्चर्येमुळे भारती बुवा स्वत:च्या तपोबलाने प्रत्यक्ष देवीशी बोलत. गाभाऱ्यासमोर पांढऱ्या संगमरवरी दगडाचा सिंह आणि उजव्या बाजूला देवीच्या विश्रांतीसाठी पलंग आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजाभवानीच्या वास्तव्यामुळे पावन क्षेत्र आहे.
सौ. अंजली हांडे, जळगाव