राज्यात भाजप (BJP) आणि मनसे (MNS)ची युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप मनसे युतीला संघाने हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे.
येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्यानंतर 6 जूनला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
यानंतर 14 जूनला युतीची औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप-मनसेची जवळीक
गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसेची जवळीक वाढताना दिसत आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेने भोंग्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. मनसेच्या भूमिकेला भाजपनेही पाठिंबा दिल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे, तर भाजपनंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आलीय. मुंबईतल्या सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला बुस्टर डोस सभा असं नाव देण्यात आलंय. अर्थात हा बुस्टर डोस ठाकरे सरकारला घेरण्यासाठी आणि राज ठाकरेंना ताकद देण्यासाठीच असेल हे उघड आहे.