आयपीएल 2023 साठीचा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात बिहारच्या गोपालगंजचा क्रिकेटपटू मुकेश कुमार याच्यावर पैशांचा पाऊस पडला. बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळणारा डावखुरा फास्ट बॉलर मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. मुकेश कुमारचे वडील ऑटो ड्रायव्हर होते.
गोपालगंजचा खेळाडू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मुकेश गोपालकंजच्या काकडकुंड गावात राहतो. मुकेशला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि पंजाब यांच्यात बिडिंग वॉर झालं, पण अखेर दिल्लीने त्याला टीममध्ये घेतलं. मुकेश कुमार इंडिया-ए टीमकडून खेळला आहे. याशिवाय तो यावर्षी भारतीय टीमसोबतही होता.
मुकेश कुमार 2006 सालच्या टॅलेंट हंटमधून सापडला होता, असं गोपालकंजचे सीनियर खेळाडू आणि बीसीएचे सहाय्यक मॅनेजर सत्यप्रकाश नवरोत्तम यांनी सांगितलं. मुकेशने टॅलेंट हंटमध्ये 7 मॅच खेळून 37 विकेट घेतल्या होत्या, ज्यात हॅट्रिकचाही समावेश होता. यानंतर मुकेशचं रणजी ट्रॉफीसाठी बिहारच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. यानंतर त्याला इंडिया-ए आणि टीम इंडियामध्ये स्थान मिळालं.
मुकेश कुमारला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. काकडकुंड गावातल्या गल्ल्यांमध्ये मुकेश क्रिकेट खेळायचा. क्रिकेटकडे जास्त लक्ष असल्यामुळे अभ्यासात दुर्लक्ष होत होतं, त्यामुळे मुकेशला घरातून ओरडाही पडायचा. पण तरी मुकेश लपून छपून क्रिकेट खेळायला जायचा. घरातली परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी मुकेशवर दबाव होता. पण क्रिकेटमध्ये मेहनत घेऊन त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे, असं त्याचे काका कृष्णकांत सिंह सांगतात.