शरद पवार खरंच नाराज आहेत? उत्तर देताना अजित पवार मीडियावरच भडकले
जयंत पाटील यांच्या निलंबनावरून शरद पवार अजित पवारांवर नाराज झाल्याचं बोललं जातंय, यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावरच घसरले आहेत. पवार साहेब नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं. ते नाराज असल्याचा तुम्हाला फोन आला होता का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला आहे.
‘हे धाधांत खोटं आहे. तुम्हाला हे कुणी सांगितलं? पवार साहेबांनी फोन करून सांगितलं? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मी साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली? तुम्हाला ब्रेकिंग न्यूज काही मिळत नाही, म्हणून अशाप्रकारच्या बातम्या तुम्ही पसरवता आणि लोकांच्या मनात समज गैरसमज निर्माण करता,’ असं अजित पवार म्हणाले.
मणिकर्णिका फेम अभिनेत्री रजिता कोचर काळाच्या पडद्याआड
बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील ज्येष्ठ अभिनेत्री रजिता कोचर यांचे 23 डिसेंबर रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रजिता कोचर यांनी अनेक चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले होते. त्या शेवटच्या कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यांनी ‘कहानी घर घर की’, ‘हातिम’, ‘कवच’ आणि इतर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची भाची नुपूर कंपानी यांनी टाईम्स इंडियाला सांगितले की, रजिता यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर त्यांना अर्धांगवायू झाला होता. तरीही त्या हळूहळू बऱ्या होत होत्या, परंतु 20 डिसेंबर रोजी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि पोटदुखीची तक्रार सुरु झाली. यामुळे त्यांना असह्य वेदना झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु काल (23 डिसेंबर) त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र काल रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘संजय राऊतांचा हाच धंदा,’ गिरीश महाजनांनी दोन शब्दांमध्ये विषय संपवला
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले तर यात एकनाथ शिंदे यांचा बचाव करण्याचा काय प्रश्न आला? असा सवाल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच रोज सकाळी बातमी पाहिजे म्हणून ते काहीही बोलतात, त्यामुळे संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही असा टोलाही यावेळी गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
कोहली अन् केएल राहुल फ्लॉप, टीम इंडियावर परभवाचे संकट
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 145 धावांचे आव्हान मिळालं आहे. आशियाई खेळपट्ट्यांवर चौथ्या डावात फलंदाजी करणं कठीण असतं. भारतीय संघाची अवस्था तिसऱ्या दिवस अखेर 4 बाद 45 अशी झाली आहे. अद्याप विजयासाठी भारताला 100 धावांची गरज असून कोहली, पुजारा, केएल राहुल आणि शुभमन गिलसारखे 4 फलंदाज बाद झाले आहेत. सध्या नाइट वॉचमन अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट हे दोघे नाबाद आहेत.
दुसऱ्या कोसटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा संघ तिसऱ्या दिवशी 231 धावा करू शकला. मीरपूरमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बॉबे या संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघालाही 100 धावांसाठी संघर्ष करावा लागणार आहे.
जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांचं खळबळजनक वक्तव्य
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज पहाटे अपघात झाला. फलटण परिसरातील पुणे- पंढरपूर रस्त्यावर मलठणमध्ये ही घटना घडली. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे चालकाचे वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी पुलावरून तीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. ज्या वाहनाचा अपघात झाला त्या वाहनामध्ये भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेमध्ये जयकुमार गोरे हे किरकोळ जखमी झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी जयकुमार गोरे यांच्या तब्यतीची पत्रकारांना माहिती देताना अपघाताबाबत शंका वाटत असल्याचं म्हटलं आहे.
जुळी मुलं केक कापण्याच्या तयारीत असतानाच पित्याच्या निधनाची बातमी आली, जवानाच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं
उत्तर सिक्कीममधल्या झेमा इथं ट्रक दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 लष्करी जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या जवानांमध्ये तीन ज्युनिअर कमिशन्ड अधिकाऱ्यांचाही (जेसीओ) समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. मृत्यू झालेल्या 16 जवानांपैकी एक जवान उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्यातल्या सौजाना गावचा रहिवासी आहे. चरणसिंह असं त्या हुतात्मा जवानाचं नाव आहे.
जवान हुतात्मा झाल्याची माहिती मिळताच ललितपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चरण सिंह यांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती मिळाली, त्यावेळी ते त्यांच्या मुला-मुलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यग्र होते. ही जुळी मुलं आहेत. 20 दिवसांपूर्वीच चरणसिंह आपली रजा संपवून ड्युटीवर गेले होते. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
‘अस्तित्वाबद्दल नेमका निष्कर्ष काढणं कठीण, पण…’; रामसेतूबाबतच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं उत्तर
भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानच्या समुद्रामध्ये असलेला खडकाळ भाग ‘राम सेतू’ म्हणून ओळखला जातो. या पुलाची निर्मिती प्रभू श्रीरामचंद्रांनी केली होती, अशी आख्यायिका आहे. रामसेतू हा अनेक वर्षांपासून वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक हिंदूंसाठी हा एक भावनिक विषय आहे. रामायण या भारतीय महाकाव्यात वर्णन केलेला हा पूल खरंच अस्तित्वात होता का याबद्दल मतमतांतरं आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही हा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘या पुलाचं अस्तित्व ‘अचूकपणे’ सिद्ध केलं जाऊ शकत नाही,’ असं सरकारच्या वतीने गुरुवारी (22 डिसेंबर) संसदेत सांगण्यात आलं आहे. पण समुद्रात दिसत असलेली खडकाळ संरचना पुलाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अस्तित्वाची ग्वाही देत आहे, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
राहुल गांधींनी आईबरोबरचा फोटो सोशल नेटवर्किंगवर केला शेअर
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या आईबरोबरच एक फोटो शेअर केला आहे. दिल्लीमध्ये सोनिया गांधी आज राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी झाल्या. त्याचवेळी राहुल यांनी आपल्या आईबरोबरचा हा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या यात्रेला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरु झाली असून सध्या ती दिल्लीत दाखल झाली आहे.आज हजारो लोकांनी राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. फरिदाबादमधून राहुल गांधींनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी यांनी राहुल यांचं स्वागत केले. येथील आश्रमाममध्ये सर्वांना तीन तास विश्रांती घेतली. दिल्लीमध्ये या यात्रेने प्रवेश करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, पवन खेरा, रणदीप सुरजेवाला, भुपिंदर सिंग हुड्डा, कुमारी शैलजा हे नेते राहुल गांधींबरोबर होते. या यात्रेमध्ये सोनिया गांधी आणि राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांनीही सहभाग घेतला.
दक्षिण आफ्रिकेत गॅस टँकरचा भीषण स्फोट, २० जण ठार
दक्षिण आफ्रिकेतील बोक्सबर्गमध्ये एलीपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.हे गॅस टँकर एका अंडरपासमध्ये अडकल्यानंतर झालेल्या गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.बोक्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील गौटँग प्रांतामधील एक शहर आहे. आज(शनिवार) सकाळी गॅस टँकर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर मोठो स्फोट झाला. हा भीषण स्फोट ओआर टँबो मोमोरियल रूग्णालयापासून काही अंतरावर झाला. हा टँकर एलपीजीचा होता. भीषण स्फोटानंतर नागरिकांची मोठी धावपळ उडाली होती.
इरफान पठाण देशात १०० प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार, पनवेलमध्ये ३३ व्या केंद्राचे उद्घाटन
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आपल्या क्रिकेट अकादमींचा विस्तार वाढवत असल्याचे दिसत आहे. कारण त्याच्या क्रिकेट अकादमी ऑफ पठाणचे ३३वे केंद्र सुरु करण्यात आले आहे. अकादमी ऑफ पठाणचे ३३वे केंद्र हे पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये सुरु केले आहे.क्रिकेट अकादमी ऑफ पठाण अकादमी मध्ये तंत्रज्ञान, ऑन-ग्राउंड अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट तज्ञांनी डिझाइन केलेले मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम क्रिकेटचे धडे शिकवण्यात येणार आहेत. याचा फायदा पनवेलसह अजूबाजूच्या परिसरातील मुलांना होणार आहे. या ठिकाणी भावी भारतीय खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच लॉन बॉलमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक तर क्रिकेटमध्ये रौप्य…!
बर्मिंगहॅम येथे झालेल्या २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. २२ सुवर्ण पदकांसह तो पदकतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला. भारतासाठी सर्वाधिक सुवर्णपदके कुस्तीमध्ये आली आहेत. एकूण पदकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारताने ६१ पदके जिंकून राष्ट्रकुल खेळांचा प्रवास संपवला. यावेळी भारताने कुस्तीमध्ये ६, वेटलिफ्टिंगमध्ये ४, लॉन बॉलमध्ये १, बॅडमिंटनमध्ये ३, बॉक्सिंगमध्ये ३, टेबल टेनिसमध्ये ४ आणि अॕथलेटिक्समध्ये १ सुवर्णपदक जिंकले.
चीनमध्ये एका दिवसात ३ कोटी ७० लाख करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले; जिनपिंग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
चीनमधील आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात या आठवड्यातील एका दिवसात तब्बल ३७ मिलियन म्हणजेच ३ कोटी ७० लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. जगामध्ये एका दिवसात सर्वाधिक लोकांना एकाच दिवशी झालेल्या संसर्गाचा विक्रम या चीनमधील करोनाच्या लाटेने मोडीत काढला आहे. जगभरामध्ये चीनमधील करोना बाधितांची आकडेवारी लपवली जात असल्याची शंका उपस्थित केली जात असतानाच चीनमधील परिस्थितीबद्दल आणि संसर्ग झालेल्यांच्या आकडेवारीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच ब्लुमबर्गच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी झालेल्या आरोग्य प्राधिकरणाच्या बैठकीमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये २४८ मिलियन लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
SD Social Media
9850 60 3590