अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव मिळालं. ठाकरेंनी आपला उमेदवारही घोषित केला. मात्र, त्यांच्या उमेदवाराचा राजीनामा BMC कडून स्वीकारला गेलेला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली असून यावर आज 11 वाजता सुनावणी होणार आहे. मात्र, यापूर्वीच मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
अंधेरी पोटनिवडणुकीवरुन त्यांनी ठाकरे गटावरच निशाणा साधला आहे. ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठीच अनिल परब यांचा हा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा सगळा डाव एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं अनिल परब म्हणत होते. मात्र, मनोज चव्हाण यांनी आता यात ठाकरे गटाचाच हात असल्याचा दावा केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये मनोज चव्हाण म्हणाले, ‘मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकंच..’.
काय आहे प्रकरण –
ऋतुजा लटके यांच्या BMC राजीनामा प्रकरणात अनेक खुलासे झाले आहेत. 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला तर अजून तो मंजूर का झाला नाही? या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं. ऋतुजा लटके यांनी हा राजीनामा कंडिशनल दिल्याची माहिती आली समोर आली होती. जर विधानसभा निवडणूक पराजित झाले तर पुन्हा BMC सेवेत घ्या, असा मजकूर राजीनामा पत्रात असल्याने या अडचणी निर्माण झाल्या.
हा असा मजकूर म्हणजे मोठी तांत्रिक अडचण आहे. राजीनामा म्हणजे कॅव्हेट नव्हे. कोणताही राजीनामा हा कंडिशनल असू शकत नाही, असा सल्ला BMC प्रशासनाला कायदातज्ञांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
आयुक्तांचं स्पष्टीकरण
दरम्यान या सगळ्या वादावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा फेटाळलेला नाही. नियमानुसार मी 30 दिवसांमध्ये राजीनाम्याबाबतचा निर्णय घेऊ शकतो. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 राजीनामा दिला. सरकारकडून दबाव असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं इक्बाल सिंग चहल म्हणाले आहेत.