दिल्लीत दररोज 8 ते 10 मृत्यू
कोरोना संसर्ग जाण्याची काही चिन्ह दिसत नाही. देशाच्या राजधानीत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असतानाच संसर्गामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही धडकी भरवत आहे. संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या संक्रमितांची संख्या देखील सतत वाढत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की कोविड 19 च्या संसर्गामध्ये वाढ होत आहे. पॉझिटिव्हचे प्रमाण देखील वाढत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना यापूर्वी कोरोना झाला आहे, अशा लोकांची अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत ज्यांना पुन्हा संसर्ग झाला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनीही ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिलंय की कोरोना साथ अद्याप पूर्णपणे संपलेली नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. लोकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहनही सक्सेना यांनी केलं आहे.
500 कोरोना बेडवर रुग्ण
लॅन्सेट कमिशनच्या सदस्या डॉ. सुनिला गर्ग यांनी सांगितले की, कोरोनाबाबत बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. पण वाढत्या केसेसमुळे रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांनी सांगितले की, दिल्लीच्या रूग्णालयांमध्ये 9 हजार कोरोना बेड्सपैकी 500 रूग्ण अजूनही दाखल आहेत. त्याच वेळी, 2129 आयसीयू बेडपैकी 20 वर बाधित रुग्ण आहेत. तर 65 लोक व्हेंटिलेटरवर आहेत. यासोबतच डॉ. गर्ग म्हणाले की, ही प्रकरणे पाहून घाबरून जाण्याची गरज नसली तरी आता काळजी घेण्याची नितांत गरज आहे.
सोमवारी दिल्लीत 1227 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह दर 14.57 टक्के नोंदवला गेला. त्याचवेळी संसर्गामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी सलग 12 दिवस दिल्लीत 2 हजारांहून अधिक संक्रमित रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, रविवारच्या प्रकरणांवर नजर टाकली तर, 2162 बाधित आढळले आणि पाच मृत्यू झाले. तर त्याच्या एक दिवस आधी शनिवारी 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी, कोरोना संसर्गामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला, जो गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक होता, त्याच दिवशी 2136 कोरोना रुग्ण आढळले आणि पॉझिटिव्ह दर 15.02 टक्के नोंदवला गेला. यापूर्वी 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकाच दिवसात 12 मृत्यू झाले होते.
सीएम केजरीवाल यांचे जनतेला आवाहन
दिल्लीतील वाढती प्रकरणे पाहता, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, कोरोनाची प्रकरणे निश्चितपणे वाढत आहेत. मात्र, घाबरण्याची गरज नाही. बहुतेक नवीन संक्रमित प्रकरणे गंभीर नाहीत. विशेष म्हणजे, दिल्लीत प्रकरणे वाढल्यानंतरही सरकारने अद्याप ग्रेडेड रेस्पॉन्स एक्शन प्लान लागू केलेला नाही.