पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला देशभरात तीनशेहून अधिक जागा मिळतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सलग तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी येथे केला.
भाजपच्या उर्ध्व आसाम क्षेत्रीय कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभानंतर झालेल्या येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आसाममध्ये भाजपला लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा मिळतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असे ते म्हणाले. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत.
काँग्रेसवर हल्ला
शहा म्हणाले की, ईशान्येकडील प्रांत हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानजा जात होता. पण राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतरही त्या पक्षाला अलीकडील विधानसभा निवडणुकांत येथे यश मिळू शकले नाही. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताचा अवमान केला आहे. त्यांनी देशाचा अवमान आणि सरकारवर खोटे आरोप करणे सुरूच ठेवल्यास ईशान्येकडे काँग्रेसची जी गत झाली, तीच संपूर्ण देशभरात होईल, अशी टीका शहा यांनी केली. काँग्रेस मोदींविरोधात जेवढी गरळ ओकेल, तेवढे भाजपचे कमळ फुलत राहील, असा दावाही त्यांनी केला.