रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर टॉयलेटचा वापर केल्यानंतर तुम्हाला जर त्याबदल्यात जीएसटीसह बिल भरण्यास कोणी सांगितलं तर ? हे ऐकल्यानंतर आश्चर्यचकित झालात?, पण तुम्हाला माहिती आहे का, रेल्वे स्टेशनवर टॉयलेटचा वापर केल्याबद्दल दोन जणांना तब्बल 12 टक्के जीएसटीसह बिल देण्यात आलं. आज तकने याबाबत वृत्त दिलंय.
तुम्ही कधीतरी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडच्या टॉयलेटचा वापर केला असेल, आणि त्यासाठी तुम्ही 5 ते 10 रुपये शुल्कदेखील भरलं असेल. आता या संबंधितच एक माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आग्रा कॅंट स्टेशनवरील एक्झिक्युटिव्ह लाउंजच्या टॉयलेटचा काही मिनिटांसाठी वापर केल्याबद्दल ब्रिटिश दूतावास नवी दिल्लीतून आलेल्या दोन पर्यटकांना 112-112 म्हणजेच 224 रुपये मोजावे लागले. या रकमेमध्ये 12 टक्के जीएसटीचा समावेश आहे. म्हणजेच टॉयलेटला जाण्यासाठीसुद्धा जीएसटी आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये टॉयलेटला जाणंदेखील एखाद्यासाठी इतकं महाग पडलं आहं. पण या प्रकारानंतर आयआरसीटीसी पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
चहाच्या कपावर घेतलं होतं 50 रुपये सेवा शुल्क
या अगोदरही आयआरसीटीसी त्यांनी आकारलेल्या सेवा शुल्कामुळे चर्चेत आलं होतं. या पूर्वी भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये 20 रुपयांच्या एक कप चहासाठी एका व्यक्तीकडून 50 रुपये सेवा शुल्क घेतलं गेलं होतं. त्या व्यक्तीला एक कप चहासाठी 70 रुपये मोजावे लागले. रेल्वेच्या या ‘हाय-फाय’ सेवेचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीने ते चहाचं बिल सोशल मीडियावर शेअर केलं होतं, त्यानंतर रेल्वेने स्पष्टीकरण म्हणून निवेदन जारी केलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा टॉटलेटसाठी जीएसटीसह तब्बल 112 रुपये घेतल्यामुळे आयआरसीटी चर्चेत आली आहे.
आयआरसीटीसीचं नेमकं म्हणणं काय?
टॉयलेटचा वापर केल्याबद्दल तब्बल 112 रुपये आकारण्याचं प्रकरण जेव्हा लाउंज मॅनेजरपर्यंत पोहोचलं, तेव्हा त्यांनी आयआरसीटीसीचा यामध्ये कोणताही दोष नसल्याचं सांगितलं. हे लाउंज एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये राहण्यासाठी 50 टक्के सूट दिल्यानंतर किमान 112 रुपये शुल्क भरणं बंधनकारक आहे, असं मॅनेजरने स्पष्ट केलं.
आयआरसीटीसीच्या मते, पैसे भरल्यानंतर येथील लोकांना लाउंजमध्ये मोफत कॉफी दिली जाते. यामध्येच तुम्ही वॉशरूम वापरू शकता. मोफत वाय-फाय वापरू शकता. पेमेंट केल्यावर तुम्ही एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये 2 तासांपर्यंत राहू शकता.
दरम्यान, आयआरसीटीसीने भूमिका स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यानंतरही या प्रकराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.